ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. धनंजय मुंडे आणि अजित पवार आदी नेतेमंडळी याप्रसंगी उपस्थित होती.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. डी. एस. कुलकर्णी यांनी अजूनही ५० कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केलेली नाही. त्यामुळे हायकोर्टाने दाम्पत्याला १३ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. मंगळवारी दुपारी डी. एस. कुलकर्णी यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या भेटीनंतर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

डी. एस. कुलकर्णी सध्या अडचणीत आले असून अटक टाळण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने डीएसके दाम्पत्याला अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा इशारा दिला होता. ठेवीदारांची देणी नेमकी कशी परत करणार याचे ठोस उत्तर घेऊन या, अन्यथा त्याच क्षणी अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करुन अटकेचे आदेश देऊ, असे हायकोर्टाने म्हटले होते.

दरम्यान, ठेवीदारांची देणी परत करण्यासाठीची २५ टक्के म्हणजेच ५० कोटी रूपये न्यायालयात जमा करण्यासाठी डीएसके यांनी  परदेशातील आपल्याच मालकीच्या कंपनीकडून या रक्कमेची जुळवाजुळव केली होती.  त्याचाच भाग म्हणून परदेशी बँकेने डीएसके यांच्या येथील बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती त्यांनी हायकोर्टात दिली होती.