देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी (३ डिसेंबर) जाहीर झाले. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. देशभरातील भाजपा कार्यकर्ते जल्लोष करत असताना बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात भीषण चित्र पाहायला मिळालं आहे. भाजपाच्या मेहकर तालुका अध्यक्ष निवडीवरून भाजपाच्याच दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपा विधानसभा संपर्क प्रमुखांना पक्षाच्या कार्यालयात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. यासह इतर काही ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे.

या मारहाणीत चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. पक्षाने एकाच तालुक्यासाठी दोन तालुकाध्यक्ष निवडल्याने वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.

बुलढाण्यात भाजपाचे जिल्हाप्रमुख प्रकाश गवई हे मेहकर येथे विधानसभा संपर्क प्रमुखांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार होते. त्याआधी प्रल्हाद लष्कर यांच्यासह २० ते २५ भाजपा कार्यकर्त्यांनी प्रकाश गवई आणि इतर भाजपा पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी भजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याच पक्ष कार्यालयात तुफान हाणामारी झाली. तालुकाध्यक्ष पदावरून हे भांडण झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे बुलढाणा भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

हे ही वाचा >> कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? बावनकुळेंच्या प्रश्नावर कार्यकर्ते म्हणाले, ‘फडणवीस’, प्रदेशाध्यक्ष शपधविधीचं ठिकाण जाहीर करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पक्षातल्या अंतर्गत वादावरून भाजपावर टीका होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांनी या हाणामारीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत भाजपावर टीका केली आहे. शिल्पा बोडखे यांनी म्हटलं आहे की, भाजपाच्या विधानसभा निवडणूक प्रमुखाला भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांची मारहाण, पाहा किती शिस्तप्रिय पक्ष आहे.