औरंगाबाद स्थानकात पाच मिनिटे थांबा घेऊन मनमाडच्या दिशेने रवाना झालेल्या नांदेड-मनमाड प्रवासी रेल्वेगाडीला दौलताबाद स्थानकाजवळील मिटमिटा गावानजीक अचानक आग लागली. शनिवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास हा थरार घडला. आगीत गाडीचा एक डबा जळून खाक झाला. यात एक जोडपे भाजून जखमी झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यास दुजोरा मिळू शकला नाही.
आगीचा प्रकार लक्षात येताच गाडी थांबेपर्यंत प्रवाशांचा एकच गोंधळ उडून सर्वामध्ये मोठी घबराट पसरली. साखळी खेचून गाडी थांबविण्याचा प्रयत्न झाला. साखळी खेचल्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर गाडी थांबली. गाडी थांबत असतानाच सावध होत प्रवाशांनी खाली उडय़ा मारल्या. मात्र, रात्रीचा अंधार व दुतर्फा दाट झाडी यामुळे कोणाला काहीच कळेनासे झाले. मदतीसाठी व गाडीतून उडी मारण्यासाठी मोठा आरडाओरडा झाल्याने प्रत्यक्ष आग विझविली जाईपर्यंत सर्वाचीच घबराट उडाली. सुदैवाने अग्निशामक दलाची मदत तातडीने पोहोचल्याने आग लवकर विझविण्यात यश आले. तोपर्यंत एक डबा जळून खाक झाला होता.
नांदेड-मनमाड प्रवासीगाडी (क्रमांक ५७५४२) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास औरंगाबाद स्थानकात आली. येथे पाच मिनिटे थांबून ती मनमाडच्या दिशेने रवाना झाली. मात्र, गाडीने पुरेसा वेग पकडला असतानाच मिटमिटा गावानजीक अचानक पाठीमागच्या तिसऱ्या क्रमांकाच्या डब्यातून, दोन डब्यांच्या मधल्या जोडामधून खालच्या बाजूने मोठा धूर येत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. काही वेळातच खिडकीच्या बाजूने एकदम आगीचे लोळ दिसू लागले. या वेळी एकच गोंधळ उडाला व भीतीने प्रवाशांमध्ये आरडाओरड सुरू झाली. काही प्रवाशांनी सावध होत गाडीची साखळी खेचली. साखळी खेचल्यावर गाडी एक किलोमीटर अंतरावर थांबली. एव्हाना अनेक प्रवाशांनी गाडीतून पटापट उडय़ा मारणे सुरू केले. रात्रीचा अंधार, सगळीकडे सामसूम, दोन्ही बाजूंनी दाट झाडी, काटेरी गवत यामुळे मदतीसाठी धावाधाव करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रामुख्याने लहान मुले, महिला व वृद्ध यांची मदतीसाठी धडपड सुरू होती. काही प्रवाशांनी महिला व मुलांना ओढून गाडीबाहेर काढले.
चालकाने रेल्वे नियंत्रण कक्षाला आगीबाबत कल्पना दिली. औरंगाबादचे स्टेशनमास्तर डी. पी. मीना यांनी अग्निशामक दल व पोलिसांना माहिती कळविली. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. आग वेळीच विझविली गेल्याने दुसरा डबा आगीपासून वाचू शकला. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर गाडी दौलताबाद स्थानकात नेण्यात आली.
आग कशामुळे लागली?
रेल्वेच्या डब्याला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण रविवारी संध्याकाळपर्यंत समोर येऊ शकले नाही. मात्र, आगीत खाक झालेल्या डब्यामध्ये चहाविक्रेत्याजवळ असते, ते शेगडी ठेवणारे स्टँड आढळून आले. त्यामुळे आग लागली असावी, अशीही शक्यता आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. शॉर्टसर्किटची शक्यताही निकाली निघाली. आगीनंतर विजेची यंत्रणा पूर्ण सुरक्षित होती. डब्याला स्वच्छतागृहाच्या बाजूनेच आग लागली. स्वच्छतागृहात काही प्रवासी हमखास सिगारेट पेटवत असतात. तेही आगीचे कारण असू शकते. रेल्वे प्रशासन व पोलिसांकडून आगीच्या कारणांचा कसून मागोवा घेतला जात आहे. ज्वालाग्राही पदार्थ डब्यात होता का, तसेच बाहेरून पेटलेला फटका वा अन्य काही फेकले होते का, याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. दहा दिवसांपूर्वी धानोरा-बोधडी बुद्रुक गावांदरम्यान रेल्वेच्या डिझेल इंजिनाला आग लागली होती. यात इंजिन बरेच जळाले असले, तरी स्फोट होण्याआधीच ते विझविण्यात आले होते. दहा महिन्यांपूर्वी, २८ डिसेंबरला नांदेड-बंगळुरू एक्स्पेस गाडीलाही मोठी आग लागली होती. या घटनेत काही प्रवासी होरपळून ठार झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2014 रोजी प्रकाशित
औरंगाबादेत मध्यरात्री ‘बर्निग ट्रेन’चा थरार!
औरंगाबाद स्थानकात पाच मिनिटे थांबा घेऊन मनमाडच्या दिशेने रवाना झालेल्या नांदेड-मनमाड प्रवासी रेल्वेगाडीला दौलताबाद स्थानकाजवळील मिटमिटा गावानजीक अचानक आग लागली. शनिवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास हा थरार घडला. आगीत गाडीचा एक डबा जळून खाक झाला.
First published on: 27-10-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burning train in aurangabad