नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात २५  जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

नाशिकजवळ झालेला अपघात दुर्दैवी आहे. या अपघाताची माहिती महामंडळ स्तरावर घेण्यात येत आहे. जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसंच जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

अपघात होताच समोरील हॉटेलवर थांबलेले देवळा रहिवासी असलेले शिक्षक संजय सदिशिव देवरे व शेतमालक गणेश देवरे यांनी बसमधील जखमींना तातडीने बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासह पोलीस यंत्रणा व रुग्ण वाहिका तातडीने घटना स्थळी हजर झाल्या. आमदारांनीही स्थानिकांची मदत घेऊन मृतांना बाहेर काढण्यास मदत केली.

अपघात कसा?
मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील कुटुंबीय सोयरिक जुळवण्यासाठी रिक्षातून देवळा परिसरात आले होते. ते परत मालेगावकडे रिक्षाने निघाले असताना मालेगावकडून कळवणकडे जाणाऱ्या भरधाव बसने रिक्षाला टक्कर दिली. ती इतकी जोरदार होती की दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.