शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आता थेट लखनऊच्या केंद्रीय औषधी व सुगंधित रोप संशोधन (सीमॅप) संस्थेतर्फे  विदर्भातील शेतकऱ्यांना मदतीचा आकर्षक प्रस्ताव देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पातळीवरील ‘सीमॅप’ संस्था औषधी व सुगंधित झाडांचे जतन, संशोधन व प्रचारासाठी कृषी खात्याअंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौदानसिंह यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या हलाखीबाबत याच संस्थेतील डॉ. महेंद्र दारोकर व अशोक नन्नावरे या वैदर्भीय वैज्ञानिकांनी सांगितले. मात्र, मदतीचा हात कुणामार्फ त द्यायचा, हा प्रश्न येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आनंदवर्धन शर्मा यांनी सोडविला.

‘सीमॅप’द्वारे विदर्भातील हवामानास व जमिनीस पोषक अशा फू ल, औषधी व सुगंधी वनस्पतीच्या वीसहून अधिक प्रजाती विकसित केल्या आहेत. खर्च कमी व अधिक उत्पादन देणाऱ्या या जाती कमी पाणी, ओलित व कोरडवाहू, अशा कुठल्याही जमिनीवर वाढू शकतात. त्याद्वारे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ हमखास होऊ शकतो, हे या वैज्ञानिकांनी निदर्शनास आणले. उत्पादननंतर मालाचे काय, या प्रश्नावर प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा मानसही संस्थेने बोलून दाखविला. एक ते दोन एकर जमीन असणाऱ्या २५ शेतकऱ्यांनी गट तयार करून विशिष्ट वनस्पतींची लागवड करावी. सुगंधित फु लांद्वारे निर्मित तेलाची खरेदी खासगी संस्थांकडून होण्याची खात्री आहे. ठराविक वनस्पती दूरवर वाहतूक करण्यायोग्य नसतात, त्यामुळे शेतालगतच त्यावर प्रक्रिया करण्याचा भर दिला जाईल.

बारमाही शक्य असणाऱ्या लिंबू गवताच्या तेलात सिट्रॉल हा मुख्य घटक आहे. गवतास कोरडवाहू जमीन अत्यंत उपयुक्त असून एकरी १४ हजार रुपये खर्च येतो. एकरी १०० किलो तेलाचे उत्पादन शक्य आहे. सीमॅप खुशनलिका नामक खस गवताच्या मुळापासून निर्मित तेलाचा सुगंधित द्रव्य, साबण यासोबतच पानमसाला, शीतपेये व तंबाखू, यात उपयोग केला जातो. ७५ हजार रुपये प्रती हेक्टरी खर्चावर एक ते सव्वा लाख रुपयाचा निव्वळ नफो अपेक्षित आहे. बबुई तुलसी नामक वनस्पतीच्या तेलाचा औषध निर्मिती व एरोमाथेरेपीसाठी होतो. प्रती हेक्टरी १५ हजार रुपये खर्चावर ४० हजार रुपयांच्या फोयदाची खात्री दिली जाते. पामारोजा या प्रजातींच्या गवताच्या तेलापासून उच्च कोटीची सुगंधी द्रव्ये तयार केली जातात. या बारमाही गवताची पाने व फु लांमधून तेलनिर्मिती होते. एकरी ३० किलो तेलाच्या उत्पादनातून ३० हजार रुपयांचा नफो मिळतो. अशाच स्वरूपाच्या विविध प्रजाती ‘सीमॅप’ विदर्भातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे. विदर्भात सर्वत्र अशी लागवड करण्यावर संस्थेने भर दिला होता, पण नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्य़ांतील शेतकरी समूहांकडून प्रामुख्याने प्रतिसाद लाभल्याने या जिल्ह्य़ात रोपटी पुरविण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी या लागवडीसाठी मिळू शकत असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.

चांगला उपक्रम

डॉ. श्याम भुतडा म्हणाले, हा अत्यंत चांगला उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. इतर कृषी उत्पादनापेक्षा हा उपक्रम कमी खर्चाचा व अधिक फोयदाचा ठरू शकतो. हिंदी विद्यापीठ हे संशोधन संस्था व शेतकरी यांच्यातील दुवा ठरले आहे.