अलिबाग– महिलामधील स्तनांच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रायगड जिल्हा नियोजन समितीने पनवेल आणि माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयांना मॅमोग्राफी मशिन्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे महिलामंधील कॅन्सर निदानाचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात २ लाख ४१ हजार महिलांची तपासणी या मशिन्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

महिलामध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत दोन मॅमोग्राफी मशिन्स खरेदी केली होती. जिल्हा वार्षिक योजनेतील २ टक्के निधी हा नाविन्यपूर्ण योजनेसाठी राखीव ठेवला जात असतो. त्यानुसा  ही मशिन्स पनवेल आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयांना देण्यात आली. ४ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी खर्च केले आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामिण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मेमोग्राफी मशिन्सच्या साह्याने आत्तापर्यंत २ लाख ४१ हजार महिलांची तपासणी करण्यात आली. ज्यात २२ महिलांमध्ये या प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे दिसून आली. त्यामुळे तातडीने २१ महिलांवर उपचारही सुरू करण्यात आले आहे. या शिवाय १ लाख १८ हजार ०५१ महिलांची गर्भाशयातील कॅन्सर निदानासाठी तपासणी करण्यात आली. २० महिलांना कॅन्सरचे निदान झाले. त्यातील १८ महिलांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या मशिन्समुळे कॅन्सरचे रुग्ण निदान करण्याचे प्रमाण वाढले आहे.

पूर्वी जिल्ह्यातील कॅन्सर सारख्या आजारांच्या चाचणीसाठी खाजगी रुगणालये अथवा मुंबईतील शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र ही मशिन्स आता जिल्ह्यात उपलब्ध झाल्याने रोग निदान करणे सहज शक्य झाले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शळके यांनी दिली आहे.

मेमोग्राफीचे मशिनचे फायदे

विशेषतः स्तनांच्या कॅन्सर निदानासाठी मॅमोग्राफी मशिन्स उपयुक्त ठरतात. या रुग्णामधील आजाराचे मशिन्समूळे अचूक निदान करणे शक्य होते. लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचू शकतो. मेमोग्राम अति सुक्ष्म कॅल्सिफीकेशनचा शोध घेऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातही कॅन्सरचे निदान होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुखाचा कर्करोग तपासणीसाठी मशिन उपलब्ध

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अलिबाग, पनवेल आणि माणगाव येथे मुखाचा कर्करोग तपासणी आणि निदानासाठी मशिन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ८३ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करून देण्यात आला होता. वर्षभरात साडेचार लाख रुग्णांची या मशिन्सच्या साह्याने तपासणी करण्यात आली. ज्यामाध्यमातून ३० जणांना कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले. ज्यापैकी २८ जणांवर उपचार सुरू करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे अलिबाग येथील जिल्हा रुग्णांलयात तीन जणांवर यशस्वी शस्त्रक्रीयाही करण्यात आल्या आहेत.