माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांच्यात लढत रंगण्याची चिन्हे दिसत असतानाच या निवडणुकीत प्रफुल्ल कदम या तरूण कार्यकर्त्यांने अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. पाणी, ऊर्जा, शेती, पाणी, आरोग्य, पर्यावरण, रोजगार आदी क्षेत्रात पायाभूत रचनात्मक कार्य करणा-या कदम यांनी आपल्या उमेदवारीमुळे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
कदम हे राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेचे अशासकीय सदस्य असून त्यांनी वेडीबाभळीपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. यात ऊर्जानिर्मितीसह जलक्रांती व कृषिक्रांतीचा नवा मार्ग दाखविण्याचा कदम यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात आपली भूमिका एका पत्रकार परिषदेत मांडताना कदम म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी दहा वर्षांपासून आपण माण नदी खोरे विकासासाठी कार्य करीत आहोत. या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा चांगला अनुभव पाठीशी आहे.  या निवडणुकीत ३५० कार्यकर्त्यांचे मनुष्यबळ कार्यरत असून यात विविध क्षेत्रात रचनात्मक कार्य करणा-या तरूणांचा समावेश असल्याचा दावा कदम यांनी केला.