scorecardresearch

शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणाऱ्या भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल; म्हणाल्या “आम्हाला कोणी गुन्हेगार…”

भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल

Shivjayanti, BJP MLA Shweta Mahale, श्वेता महाले
भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल (Photo: Facebook)

शिवजयंतीनिमित्त बुलढाण्यातील चिखली शहरातून महिलांची  मोटारसायकल रॅली काढण्यात आली. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास चिखली शहरांमधून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र करोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचे सांगत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.

विनापरवाना मोटारसायकल व स्कुटी रॅली काढून जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे जमावबंदी आदेशाचे व महाराष्ट्र शासनाचे कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर पोलिसांनी लावला आहे. यामध्ये आमदार श्वेताताई महाले, जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी नगरसेविका संगिता गाडेकर, मीनल गावंडे, नेहा खरात,  किरण गाडेकर, विजया खडसन, सुरेखा पडघान, मनीषा सपकाळ यांच्यासह अनिकेत सावजी,अमोल खेडेकर व इतर ३० ते ३५ स्कुटी चालक महिलांचा समावेश करण्यात आहे.

होय, आम्ही गुन्हेगार – भाजप आमदार श्वेता महाले

“चिखली शहरातून जिजाऊच्या लेकींनी शांततेच्या मार्गाने काढलेल्या बाइक रॅलीमुळे त्या जर गुन्हेगार ठरत असतील तर असे गुन्हे वारंवार करण्यासाठी आम्हीसुद्धा सज्ज आहोत आणि आम्हाला कोणी गुन्हेगार म्हटले तरी त्याची आम्हाला तमा नाही,” अशी प्रतिक्रिया श्वेता महाले यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Case against bjp mla shweta mahale over rally on shivjayanti sgy