करोना नियमभंगाबद्दल मात्र सेवकाविरुद्ध गुन्हा

सोलापूर : करोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असताना एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा जंगी स्वरूपात झाला. यावेळी सात ते आठ आमदार-खासदारांसह अडीच ते तीन हजार नागरिकांचा समुदाय हजर होता. यात करोना प्रतिबंधक नियमावलींचा फज्जा उडाला.

दुसरीकडे पोलिसांनी याप्रकरणी लोकप्रतिनिधीशी संबंधित संस्थेतील सेवकावर जबाबदारी ढकलून एकटय़ा त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. बार्शी येथील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊ त यांच्या दोन्ही मुलांच्या विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला.

या विवाह सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आदी हजर होते. या विवाह सोहळ्यात करोना प्रतिबंधक नियमांचा बोजवारा उडाला. आश्चर्य म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी परवानगी घेतली म्हणून आमदार

राऊ त यांच्या एका संस्थेतील सेवक योगेश मारुती पवार (वय २२, रा. बार्शी) याच्या एकटय़ाला जबाबदार ठरवून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याखाली बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अन्य सामान्य नागरिकांसाठी प्रशासनाचा वेगळा न्याय आणि लोकप्रतिनिधींच्या मुलांसाठी वेगळा न्याय कशासाठी, असा सवाल बार्शीकरांनी उपस्थित केला आहे.