अहिल्यानगर: महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांच्यासह बारा ते पंधरा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील रघुनाथ राहिंज (रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्यादी दिली आहे.
महावितरणच्या केडगाव उपकेंद्रात ही घटना काल, मंगळवारी रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास घडली. अभियंता राहिंज व त्यांचे सहकारी राहुल सीताराम शिलावंत, सुग्रीव नामदेव मुंडे, गोरक्षनाथ रोहकले हे केडगाव कार्यालयात असताना तेथे अमोल येवले व इतर १२ ते १५ अनोळखी व्यक्ती कार्यालयात आल्या. तुम्ही काय काम करता, नुसते मोबाईल बघता, किती वेळ झाला वीज नाही, असे म्हणत त्यांनी गोंधळ घातला.
कार्यालयातील खुर्च्या, रजिस्टर फेकले, राहिंज यांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचवेळी अनोळखी व्यक्तीने काहीतरी टणक वस्तूने पाठीमागून मारहाण केली. त्यांचे सहकारी राहुल शीलावंत यांनाही शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.