अहिल्यानगर : शिवसेनेच्या (ठाकरे गट) युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम अनिल राठोड यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात योगेश बाबासाहेब सोनवणे (वय ३१, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान विक्रम राठोड यांनी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे निवेदन दिले आहे.

विक्रम राठोड यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत राजकीय गाणी वाजवली जात होती, त्याला विरोध केल्याने खोटा गुन्हा दाखल केला. योगेश सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले की अण्णा भाऊ साठे जयंतीची मिरवणूक रात्री ९.३० च्या सुमारास नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात आली असता कोणतेही कारण नसताना विक्रम राठोड यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती करत आहेत.

पोलिसांवर राजकीय दबाव- खासदार लंके

नगर शहरात पोलिस यंत्रणेचे राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक योगीराज गाडे, प्रदिप परदेशी, युवा सेनेचे प्रशांत भाले, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, दिपक भोसले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नलिनी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हंटले कि, नगर शहरातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आता युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही प्राथमिक चौकशी न करता अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरले असून, फिर्यादी व्यक्तीचा संबंध सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी असल्याचे खासदार लंके यांचे म्हणने आहे.

या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे, सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱ्या फिर्यादी व्यक्तीच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिस प्रशासनाच्या पक्षपाती कारभाराची गृह विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी करून खासदार लंके म्हणाले, विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत, तर प्रत्यक्ष गोंधळ घालणाऱ्यांना अभय दिले जात आहे. ही बाब केवळ अन्यायकारक नसून, लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे.

नगर शहरात घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे जे कर्तव्य पोलीस दलावर आहे, त्याच संस्थेवर राजकीय दबावाखाली अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत आहे, हे अत्यंत गंभीर आहे. खोटे गुन्हे नोंदवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी.