लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी संस्थाचालकासह दोघांना चार वेळा जन्मठेपेची शिक्षा इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी ठोठावली. या प्रकरणी पिडीतांच्याकडून आलेल्या निनावी पत्राची दखल घेत पोलीसांनी पुढाकार घेऊन कारवाई केली होती.
संस्थाचालक अरविंद आबा पवार (६६) आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे (४३, दोघे रा. कुरळप) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयाने मुक्तता केली. अत्याचारित चार पीडित मुलींना प्रत्येकी ५० हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाच्या रकमेतील नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आणखी वाचा-सोलापूर : चारशे रूपयांसाठी दोन महिलांनी नात्यातील महिलेला पेटविले
पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रावरून या अत्याचाराच्या घटनेची पोलीसांनी पोलखोल केली. त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहायक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक करुन दोघांविरुध्द इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
न्यायालयात पीडित मुलींच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून न्या. ए एस गांधी यांनी चार पिडीतांच्या तक्रारीमध्ये चार वेळा जन्मठेप व दंड अशी शिक्षा सोमवारी ठोठावली. चार जन्मठेपेची शिक्षा एकाचवेळी आरोपींना भोगावी लागणार आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील आणि रणजित पाटील यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि महिला पोलीस सूर्यवंशी यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.