अहिल्यानगर: एमआयडीसीतील उद्योजकाला ६ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे. अद्याप आरोपींना अटक केली नसल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्येच बॅटरी उत्पादन करणाऱ्या एका नामांकित कंपनीत पुरवठादारांकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहनांना अडवून, वाहनचालकांना दमदाटी व मारहाणीची धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आता पुन्हा खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

मध्यंतरीच्या काळात एमआयडीसीतील उद्योजक कामगार संघटनांच्या दहशतीमुळे त्रस्त झाले होते. आता पुन्हा उद्योजकांना याचा त्रास जाणवू लागला आहे. उद्योजकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यापलीकडे कारवाई केलेली नाही. एमआयडीसीमध्ये उद्योजकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बैठका घेऊन उद्योजकांना आश्वस्थ केले होते, मात्र खंडणीचे प्रकार सुरूच आहेत.

एमआयडीसीतील एका छोट्या उद्योजकाला त्याची कंपनी सुरू ठेवण्यासाठी तसेच काम मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन वर्षांपासून धमकावून त्याच्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची तक्रार आहे. यासंदर्भात उद्योजकांने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोल्हेगाव उपनगरातील दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे. ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२५ या दरम्यान धमक्या देऊन एमआयडीसीमध्ये कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी, वर्क ऑर्डर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैशाची मागणी करून एकूण ६ लाख रुपये घेतले, मात्र कंपनीला काम मिळाले नाही, अशी तक्रार आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलिस अंमलदार खेडकर करत आहेत.

नागापूर एमआयडीसीत नवे उद्योग सुरू होण्यासाठी जागेची टंचाई जाणवत आहे. मात्र आहे ते उद्योग सुरू ठेवण्यासाठी आता उद्योजकांना कामगार संघटनेकडून त्रास जाणवू लागला आहे.

काही महिन्यांपूर्वी नागापूर एमआयडीसीचे विस्तारीकरण करण्यासाठी ६०० हेक्टर जमीन उपलब्ध करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याचवेळी शिर्डी येथेही नवीन एमआयडीसी साठी ६०० हेक्टर जमीन देण्यात आली. शिर्डी येथील जागेत नवीन उद्योग सुरू झाले, मात्र नागापूर एमआयडीसीसाठी उपलब्ध करण्यात आलेली सहाशे हेक्टर जमीन अद्यापि औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात मिळालेली नाही. अशा परिस्थितीतच आता नागापूर एमआयडीसीमधील उद्योजकांना खंडणीखोरांचा त्रास सुरू झाला आहे.