कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा एक गट खुलेआम ‘आप’ चा प्रचार करत आहे. स्वपक्षीयांना सोडून विरोधकांचा प्रचार करणाऱ्या नेता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांला पक्षाकडून दरवर्षी व्हीप, कारणे दाखवा नोटीस िंकंवा निलंबित, बडतर्फ किंवा पक्षातून हकालपट्टी केली जायची, परंतु यंदाच्या निवडणुकीत सर्व काही राजरोसपणे सुरू असताना ना नोटीस ना हकालपट्टीची कारवाई होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर होताच सर्व पक्षात सक्रीय नेत्यांच्या एका गटाकडून नाराजीचा सूर आवळला गेला. भाजपमध्ये हंसराज अहीर यांना लागोपाठ पाचव्यांदा उमेदवारी मिळाली म्हणून आमदार शोभा फडणवीस तीव्र नाराज झाल्या. त्यामुळे त्या या जिल्ह्य़ात प्रचारात सक्रीय न होता थेट अमरावती येथे महायुतीचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारात सहभागी झाल्या, तर कॉंग्रेसने संजय देवतळे यांना उमेदवारी दिल्यामुळे माजी खासदार नरेश पुगलिया नाराज झाले. त्याचा परिणाम पुगलियांनी स्वत:ला निवडणुकीपासून दूर ठेवले आहे, तर त्यांचे समर्थक महापौर संगीता अमृतकर व नगरसेवकही प्रचारात सहभागी झालेले नाहीत. तिकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर हे सुध्दा भाजप नेत्यांवर रागावलेले आहेत, तर या जिल्ह्य़ात अनेक गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते देवतळे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे तेही कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. आता यातील बहुतांश नेत्यांनी केवळ व्यक्ती दोषापोटी स्वपक्षाऐवजी आपचा प्रचार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी सभापती अॅड.मोरेश्वर टेमुर्डे देवतळे विरोधासाठी म्हणून आपचा प्रचार करीत आहेत. विशेष म्हणजे, टेमुर्डे यांचे अॅड. चटप यांच्याशी मतभेद आहेत, परंतु चटप राजुरा मतदारसंघातील आणि देवतळे वरोरा मतदारसंघातील. त्यामुळे लांबचे मतभेद लांब ठेवत त्यांनी जवळच्या मतभेदाला अधिक महत्व दिले आहे, तर राष्ट्रवादीचे इतर अनेक नेतेही आपची अदृश्य टोपी चढवून कार्यकर्त्यांना इशारे देऊन काम करत आहेत.
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी तर तुम्ही आम्हाला विधानसभेत मदत करत असाल तरच आम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीत मदत करू अन्यथा नाही, अशी थेट देवाण-घेवाणीची भाषाच केली. समोरच्यांनी होकार देताच राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, मूल, गोंडपिंपरी व बल्लारपूर येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपची टोपी चढविली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य प्रामाणिकपणे कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करत आहेत, तर त्यांचे पक्षातील अनेक सहकारी आप कसा दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे लोकांना पटवून देत आहेत.
काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक प्रचारात आपला मदत करत आहेत. आम्ही खुलेआम प्रचारात सहभागी होऊ शकत नाही, असे म्हणून अप्रत्यक्षपणे आपचा प्रचार करत आहे, तर शिवसेनेचे काही नाराज नेते पक्षनिष्ठा सोडून जातीला महत्व देत आहेत. त्यामुळे आपचे चांगलेच फावले आहे. सर्व पक्षातील नाराज नेत्यांचा आपला चांगला पाठिंबा मिळत आहे. एकूण सर्वच पक्षात नाराजीच्या भावनेतून केवळ व्यक्ती दोषामुळे पक्षीय उमेदवाराला मदत न करता विरोधकांना मदत करण्यात गुंतल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या सर्व घडामोडींकडे प्रदेश पातळीवरील नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे, तर कॉंग्रेसचे नगरसेवक आधीच राजीनामानाटय़ करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही पक्ष कारवाईची भीती नाही. शिवसेनेत तर कारवाई करायची म्हटली तर वरपासून खालपर्यंत सर्वावर कारवाई करावी लागते. त्याला कारण या जिल्ह्य़ात शिवसैनिक जेवढा शिवसेनेशी एकनिष्ठ नाही तेवढा कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेला, तसेच जातीला प्राधान्य दिल्यामुळे आपचे उमेदवार वामनराव चटप यांच्या प्रचाराचे स्वरूप सर्वपक्षीय झाल्याचे बघायला मिळत आहे.