विदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, चंद्रपूरमधील धाबा नदीवर असलेल्या छोट्या पुलावरून जाताना पूराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक गुरं वाहून गेल्याचे वृत्त आहे. याचा मन हेलावणारा व्हिडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे. काल (सोमवारी) सकाळी ही दुर्घटना घडली.

या व्हिडिओमध्ये, सुमारे ५० गुरं एका पुलावरुन नदीच्या एका काठावरुन दुसऱ्या काठावर जाताना दिसत आहेत. यावेळी परिसरातील मुळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. या पूलावरुन नदीचे पाणी वेगाने वाहत होते. याचवेळी एका वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये काही गुरं नदीच्या वाहत्या पात्रात पडली त्यानंतर बाहेर येण्यासाठी ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होती.

विविध माध्यमांतील वृत्तानुसार, या घटनेमध्ये सुमारे १० गुरं ही या वाहत्या पाण्यात वाहून गेली होती त्यांपैकी ५ जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. स्थानिकांकडून बाचावाचे कार्य सुरु असताना एका ग्रामस्थाने आपल्या मोबाईल फोनमध्ये याचे छायाचित्रण केले.

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही पाऊस तुफान बरसतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे पाऊस वाढल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी आष्टी-बल्लारपूर महामार्गाला जोडणारा तात्पुरता पूलही वाहून गेला होता.