सोलापूर : सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव यांचा १५ वर्षांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. परंतु त्याचा तपास अद्यापि न लागल्याने शेवटी केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्यात आला आहे. तरीही तपासाची दिशा सापडत नसल्यामुळे सीबीआयने मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सीबीआयच्या विशेष पथकाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्राचार्य होनराव यांच्या खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यामुळे आता १५ वर्षांनंतर तरी या खून प्रकरणाचे गूढ उलगडले जाणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दालनातच खून

प्राचार्य महेश होनराव (वय ३६) यांचा १ मार्च २०१० रोजी अज्ञात व्यक्तींनी खून केला होता. हा खुनाचा प्रकार त्यांच्या दालनातच घडला होता. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यासह परिसरातील माण प्रदेशात आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

सुरुवातीला या घटनेचा तपास सांगोला पोलिसांनी हाती घेतला होता. परंतु कोणतेही धागेदोरे हाती लागत नसल्यामुळे तपासाची सूत्रे मंगळवेढ्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजय स्वामी यांनी घेतली होती. त्यांनी सहा महिने तपास केला. परंतु तरीही प्राचार्य होनराव यांचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल झाली नव्हती.

दरम्यान, प्राचार्य होनराव खून प्रकरणाचा तपास लागत नसल्यामुळे त्यांच्या पत्नी रूपाली होनराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय यंत्रणेकडे तपास सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने प्राचार्य होनराव खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला होता.

सीबीआयने काही दिवसांपूर्वी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीबीआयनेही आता प्राचार्य होनराव खून प्रकरणाची अचूक माहिती देण्याऱ्या व्यक्तींना दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यातूनही या खून प्रकरणाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.