शहरातील महत्त्वाच्या भुयारी गटार योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र बुधवारी महापौर संग्राम जगताप यांना प्राप्त झाले. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेतून शहरातील हा प्रकल्प मार्गी लागल्याची माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही वेळ आधी ही मंजुरी मिळाल्याचा  आनंद जगताप यांनी व्यक्त केला.
महापौर जगताप व महानगरपालिकेचे यंत्र अभियंता परिमल निकम सध्या दिल्लीतच आहेत. येथेच त्यांना योजनेच्या मंजुरीचे पत्र प्राप्त झाले. शहरासाठी आजवर मिळालेली ही सर्वात मोठी योजना आहे. त्यासाठी तब्बल २६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ८० टक्के केंद्र सरकारचा सरकारचा निधी, राज्य सरकार व मनपाचा प्रत्येकी १० टक्के निधी अशा नियोजनातून ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे असे जगताप यांनी दिल्लीहून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
महापौरांसह मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. चाळीस वर्षांपूर्वी जुन्या शहरात भुयारी गटार योजना राबवण्यात आली. नंतरच्या काळात शहराचा मोठा विस्तार होऊनही अशी कुठली योजना मिळाली नव्हती. त्यामुळेच सावेडीतील भुयारी गटार योजनेसाठी गेले पंधरा ते वीस वर्षे संघर्ष सुरू होता. आता पूर्ण शहर म्हणजे मनपाच्या सध्याच्या हद्दीत  ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली असून सावेडीसह नागापूर, बोल्हेगाव, केडगाव, सारसनगर अशा पूर्ण शहरात ही योजना राबवण्यात येणार आहे.
राज्य सरकारमार्फत हा प्रस्ताव दिल्लीला केंद्रीय नगर विकास विभागाकडे सादर झाला होता. २६६ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेसाठी मनपाला त्यातील अटीनुसार १० टक्के म्हणजे २६ कोटींचा निधी उभारावा लागेल. योजनेंतर्गत शहरात ६५० किलोमीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिनीचे जाळे तयार करण्यात येणार आहे. महापौर जगताप यांनी मंगळवारी पुण्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. या योजनेबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते व निकम लगेचच दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारीच लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच देशभरात आचारसंहिता लागू केली. त्याचा अंमल सुरू होण्याच्या काही वेळ आधीच योजनेच्या मंजुरीचे पत्र प्राप्त झाले असे जगताप यांनी सांगितले. आता योजनेला तातडीने गती देऊन दर्जेदार पद्धतीने निर्धारित मुदतीतच ती पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
मैला शुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश
पूर्ण शहराच्या भुयारी गटार योजनेतच मैला शुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार फकीरवाडा येथील पूर्वीच्याच बंद पडलेल्या केंद्राचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करून ५२ एमएलडी क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तेथे या पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून नदीत सोडण्यात येईल अशी माहिती परिमल निकम यांनी दिली.