scorecardresearch

केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ला येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला

केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

सावंतवाडी : भारतात समान नागरी कायदा होत असेल तर आमचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने तो लागू केला तर मनसे स्वागत करेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसा तो राज्य पातळीवर लागू करता येणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच पुढाकार घ्यावा लागेल आणि तो कायदा संपूर्ण देशात लागू होईल. म्हणून संपूर्ण भारतात समान नागरी कायदा यावा अशी आमची मागणी आहे आणि ते केंद्र सरकारच्याच हातात आहे, असे राज यांनी स्पष्ट केले.    

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ला येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. ते केवळ फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलणे चुकीचे असल्याचेही मत राज यांनी नोंदवले.   १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. तेव्हापासून या राज्यात जातीयतेचे विष कालवले जात असून पवार हेच त्याचे निर्माते आहेत. येथील इतिहासाचाही वापर जातीयता निर्माण करण्यासाठी केला जात आहे. 

इतिहास रूक्ष आहे. तर्काच्या आधारावरती कुठेही मूळ पुरुषाच्या इतिहासाला धक्का न लावता, त्रास न होता, चुकीचे अर्थ न लावता इतिहासकार तो मांडत असतात. यासाठी पोवाडे व इतर माध्यमांचा वापर केला जात होता, असे ठाकरे यांनी नमूद केले.

जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे

सावंतवाडी : जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे. पण सध्या जातीतून इतिहास पाहण्याचे पेव फुटले आहे. ठरावीक मूठभर लोक असे करत असून त्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केले.‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरून उठलेल्या वादंगाबाबत  ते म्हणाले की, याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो. त्यांनी इतिहासकार गजानन मेहेंदळे म्हणतात ते खरे असल्याचे सांगितले. मेहेंदळे इतिहासाचे अभ्यासक आहेत. ते म्हणाले की, जगातील कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते वीर सात होते की आठ होते की दहा होते, हे कोठेही लिहिलेले नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण ऐकलेली सर्व नावे काल्पनिक  आहेत. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 05:18 IST

संबंधित बातम्या