मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांमध्ये गारपीट, तसेच अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झाले नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. त्यामुळे गारपीटग्रस्त भागासाठी केंद्र व राज्याने संयुक्त विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. कॅबिनेटची विशेष बठक बोलवावी, यासाठी राज्यपालांचा वेळ घेऊन त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
सोमवारपासून मुंडे यांनी बीड येथून पाहणी दौरा सुरू केला. माजलगाव व गेवराई तालुक्यातील गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली. आपण स्वत: ११ गावांना भेटी दिल्या. या वेळी मोठे विदारक चित्र या भागात पाहायला मिळाले, असे सांगून पत्रकार बठकीत मुंडे म्हणाले की, २८ फेब्रुवारीपासून सातत्याने गारपीट व अतिवृष्टी सुरू आहे. रब्बी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. मराठवाडय़ात सातजण मरण पावले. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे अजूनही पंचनामे झाले नाहीत. शेतकरी पुरता हतबल झाला. सलग दोन वष्रे दुष्काळ व आता अवकाळी पावसासह गारपीट यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित पूर्ण कोलमडले. त्याच्याकडे उत्पन्नाचे कसलेही साधन उरले नाही. त्यामुळे शेतक-यांचे संपूर्ण कर्ज व वीजबिलही माफ करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.
लोकांचा सरकारवर विश्वास नाही. गतवर्षीची दुष्काळाची मदत अजूनही मिळाली नाही, पंचनामे झाले नाहीत, यंत्रणा झोपली आहे. अशा विशेष आपत्तीत इतर जिल्ह्य़ातून यंत्रणा मागवून पंचनामे करणे अपेक्षित आहे. नुकसानीचा अंदाजच नाही, तर मदत कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करून आपण राज्यपालांकडे वेळ मागणार असून गारपीटग्रस्तांना मदत करण्यासाठी पॅकेज उपलब्ध करून द्यावे, यासाठी कॅबिनेटची तातडीने बठक बोलावून निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार आहोत. प्रसंगी पंतप्रधानांनाही भेटून गारपीटग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागात उशिराने दौरा केला. राज्याच्या पुनर्वसनमंत्र्यांसह इतर ४० मंत्री कुठे आहेत, असा सवालही मुंडे यांनी केला. सरकारने ३ दिवसांत पंचनामे व ५ दिवसांत मदत वाटप करावे, अन्यथा शेतकऱ्याला रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा मुंडे यांनी दिला.