महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा  टोला

नगर : केंद्र सरकारने सहकार विषयासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले, ज्येष्ठ मंत्री त्यासाठी दिला, परंतु त्यांचा हेतू काही आम्हाला समजलेला नाही असा टोला, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. यापूर्वीच केंद्र सरकारने एक कायदा संमत करून सहकारी बँकांवरील विशेषत: अर्बन सहकारी बँकांवर मर्यादेपेक्षा अधिक नियंत्रण आणले आहे. त्यामुळे अध्यक्ष व संचालकांचे अधिकारही कमी झाले आहेत. सहकार तत्त्वावर त्यामुळे बाधा येते, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात महागाईवरून आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठी महसूल मंत्री थोरात नगरमध्ये होते. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सहकार मंत्रालय निर्माण करण्यावरून केंद्र सरकारला टोला लगावला.

केंद्र सरकारच्या नवीन कायद्यामुळे रिझर्व्ह  बँकेचे सहकारी बँकांवर मर्यादेपेक्षा जास्त नियंत्रण आले आहे. त्यामुळे सहकार तत्त्वाचा प्राण त्यामध्ये टिकताना दिसत नाही. रिझर्व्ह  बँकेच्या नियंत्रणामुळे अध्यक्ष व संचालक मंडळाचे अधिकार कमी झाले आहेत. चुका झाल्या तर त्याबद्दल शिक्षा करा, परंतु सहकार तत्त्वाला बाधा नको. नवीन मंत्रालयाचा सहकार बळकट करण्यासाठी वापर व्हावा, अशी अपेक्षाही थोरात यांनी व्यक्त केली.

करोना परिस्थिती तसेच ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांसाठी दिलेला ४८ तासाचा अवधी, यामुळे अधिवेशन दोन दिवसाचे ठेवले गेले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी किमान चार दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळेच अध्यक्षपदाची निवड होऊ शकली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काँग्रेसने वनमंत्री  व अध्यक्ष अशी दोन्ही पदे सोडायला नको होती, असे वक्तव्य केले, त्याकडे लक्ष वेधले असता थोरात म्हणाले की, जाधव यांचे ते वैयक्तिक मत आहे. त्यांनी अध्यक्ष म्हणून चांगले काम केले असले तरी काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव आहेत.

मोदी यांनी लोकांची माफी मागावी

आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी होत असताना देशात मात्र ते वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे अर्थव्यवस्था गर्तेत सापडली आहे, व्यापार मंदावला, जीएसटी अव्यवहार्य ठरली आहे. याचा परिणाम महागाईवर होत आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलचे दर ७ पैशांनी वाढले म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी बैलगाडी मोर्चा काढला होता. आता इंधनाचे दरवाढ वाढलेले असताना भाजप कार्यकर्ते घराबाहेर पडायला तयार नाहीत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोठे लपून बसले आहेत? सर्वसामान्यांचे जीवन कठीण केल्याबद्दल मोदींनी लोकांची क्षमायाचना करावी, अशी टीकाही महसूलमंत्री थोरात यांनी केली.

उत्तर टोलावले

महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी होऊन सत्ता स्थापन करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सत्तेत आहे की विरोधात असा प्रश्न महसूलमंत्री थोरात यांना केला असता, त्यांनी ‘माहिती घेऊन सांगतो’, असे म्हणत उत्तर टोलवले.