साखरसम्राटांनी उभे केलेले आव्हान मोडीत काढीत शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा १ लाख ७७ हजार ८१० इतक्या मतांनी पराभव केला. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार ४२८ इतकी तर कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ४ लाख ६२ हजार ६१८ इतकी मते मिळाली. या विजयाच्या आधारे शेट्टी यांनी दुसऱ्यांदा शिवरातून संसद गाठण्याची किमया केली आहे.  निकालानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. खासदार शेट्टी यांना  शुभेच्छा देण्यासाठी कार्यर्त्यांची रिघ लागली होती. तर इचलकरंजी  शहर काँग्रेस कमिटीमध्ये शुकशुकाट दिसून येत होता.
गत लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या श्रीमती निवेदिता माने यांचा ९५ हजार मतांनी पराभव केला होता. तर या निवडणुकीत शेट्टी यांनी तब्बल १ लाख ७७ हजार मतांची म्हणजेच दुप्पट आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि नेतेमंडळी कोठे कमी पडली याचेही आत्मचिंतन होण्याची गरज आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात १ लाख ९२ हजार ४५३ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यामध्ये आवाडे यांना ७७ हजार ८७९ तर शेट्टी यांना ९७ हजार ६९१ मते मिळाली आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य शक्ती-पिपल्स् रिपब्लिकन पार्टी-मित्रपक्षांचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे, शिवसेना-भाजपा-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी, महाराष्ट्र आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सुरेशदादा पाटील आणि आम आदमी पार्टीचे रघुनाथदादा पाटील यांच्यासह १३ उमेदवार निवडणूक िरगणात होते. रिंगणात १३ उमेदवार असले तरी खरी लढत आवाडे विरुद्ध शेट्टी म्हणजेच शेतकरी विरूद्ध कारखानदार अशीच दिसत होती. त्यामुळे आवाडे यांच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह यूपीएच्या दिग्गजांनी परिश्रम घेतले.
अगदी पहिल्या फेरीपासूनच शेट्टी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केल्याने पुढे काय होणार हे स्पष्टच होत गेले. सुमारे सात ते दहा हजार मतांचे अधिक्य शेट्टी हे प्रत्येक फेरीवेळी घेत गेल्याने त्यांच्या मतांचा आकडा चांगलाच फुगला होता. पाचव्या फेरीअखेर शेट्टी हे सुमारे ६० हजार मतांनी पुढे असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू युवा नेते राहुल आवाडे यांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडणे पसंत केले. खासदार शेट्टी यांनी लाखाच्यावर मताधिक्य घेतल्यानंतर भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शहर विकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात दुचाकी रॅली काढून चौकाचौकात प्रचंड जल्लोष केला.  रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी शिट्टय़ांच्या आवाजांनी सारा परिसर दुमदुमन सोडला होता. काही उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकी गाडीच्या पुंगळ्या काढल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली होती. त्यामुळे कार्यकत्रे आणि पोलीस यांच्यात वादावादीचे प्रकारही घडले.
निकालानंतर शेट्टी समर्थकांनी शहरात मोटरसायकली रॅली काढून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांचा उत्साहीपणा पाहून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी उशिरापर्यंत हा जल्लोष सुरूच होता.
विजयानंतर शेट्टी यांनी आपला विजय हा सामान्य जनतेच्या अस्मितेतून उगवलेला आहे, असे नमूद करून त्याचे श्रेय मतदारांना दिले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सर्व साखरसम्राटांची ताकद माझ्या विरुद्ध उभी केली होती. पण सामान्य जनतेने निवडणूक आपल्या हाती घेऊन त्यांचा माज उतरवला आहे.