हिंगोलीत २ लाखांवर ग्राहकांकडे ३२१ कोटींची वीजदेयके थकली

जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे सुमारे २ लाख १ हजार ३३२ ग्राहक असून त्यांच्याकडे ३२१ कोटींचे देयक थकले आहे. हे देयक वसुलीचे मोठे आव्हान महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर आहे.

जिल्ह्यातील महावितरण कंपनीचे सुमारे २ लाख १ हजार ३३२ ग्राहक असून त्यांच्याकडे ३२१ कोटींचे देयक थकले आहे. हे देयक वसुलीचे मोठे आव्हान महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर आहे.
जिल्ह्यात घरगुती वीजग्राहकांची संख्या ९३ हजार ३५३ असून, त्यांच्याकडे ११ कोटींची थकबाकी आहे. वाणिज्याचे ४ हजार ६६० ग्राहक असून, त्यांच्याकडे १ कोटी ३० लाख रुपये, औद्योगिक क्षेत्रात १ हजार ७५५ ग्राहक असून त्यांच्याकडे १ कोटी ३ लाख रुपये, तर कृषिपंपाचे ५९ हजार ७६० ग्राहक असून त्यांच्याकडील थकित देयकाचा आकडा २२२ कोटी ६५ लाख रुपयांवर गेला आहे.
शहरातील पथदिव्यांचे ९९३ ग्राहक असून त्यांच्याकडे १४ कोटींचे देयक थकले आहे. जिल्ह्यात ३६२ पाणीपुरवठय़ाच्या ग्राहकांकडे ३ कोटी ३३ लाखांची देयके थकली आहेत. या शिवाय सुमारे ४० हजारांवर वीजजोडण्या कायमस्वरूपी बंद केल्या असून, त्यांच्याकडे ५२ कोटींचे देयक थकले आहे.
जिल्ह्य़ात एकूण ३२१ कोटी थकित देयकाची वसुली करण्यासाठी महावितरणने गेल्या काही दिवसांत अनेक उपक्रम राबविले. बिल थकवणाऱ्यांची वीज तोडली. वीज देयकाचा भरणा व्हावा, या साठी गावपातळीवर वाहने पाठविली. ज्या विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कमी देयक वसूल केले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र, एवढे होऊनही थकित देयकाची वसुली होत नसल्याने महावितरणचे वरिष्ठ अधिकारी धास्तावले आहेत.
पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा आहे ते शेतकरी वीजपंप वापर करीत आहेत. परंतु ज्यांचे पंप बंद असून वीज देयकाची रक्कम थकली आहे, अशा एकूण कृषिपंप ग्राहकांकडे २२२ कोटी ६५ लाखांची थकबाकी आहे. कृषिपंपाकडील थकबाकी वसूल करण्याचे महावितरण अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. अधिकाऱ्यांनी कृषिपंपाची वीज खंडित करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, शेतकऱ्यांच्या संतापासमोर वसुली अधिकारी-कर्मचाऱ्यांची डाळ शिजत नसल्याचे चित्र आहे.
विष्णुपुरी उपसा सिंचन  प्रकल्पाचे वीजबिल माफ
वार्ताहर, नांदेड
राज्याच्या काही भागांत निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता अन्य प्रकल्पांप्रमाणेच विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्पाचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका राज्याच्या काही भागांत, विशेषत: मराठवाडय़ाला मोठय़ा प्रमाणात बसला. जूनपाठोपाठ जुलै महिनाही कोरडा गेल्यानंतर शेतकरी हतबल झाला आहे. दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवल्यानंतर आता तरी पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होता. मात्र, पावसाचा रुसवा कायम असल्याने मराठवाडय़ातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. सर्वच मोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात काही टक्के पाणीसाठा असला, तरी आता प्रशासनही हवालदिल झाले आहे. पावसाची वक्रदृष्टी, शिवाय भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याचे पाणी कसे मिळेल, या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे.
राज्याच्या काही भागांत दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन सरकारने यापूर्वी लाकारी, म्हैसाळ, टेंबूजनाई, शिरसाई, पुरंदर, उरमोडी व मुक्ताईनगर या उपसा सिंचन प्रकल्पांचे वीजबिल माफ केले. आता विष्णुपुरीचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाटबंधारे विभागाला वीजबिल माफी मिळल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन जुलैच्या पहिल्या आठवडय़ात जिल्हा प्रशासनाने विष्णुपुरी प्रकल्पातून पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजमीटर बंद करण्याचे आदेश दिले होते. पावसाच्या लहरीपणाने शेतकरी किमान पिण्यापुरते तरी पाणी मिळावे, अशा अपेक्षेत आहेत. पाऊस पडावा, यासाठी सिडको येथील गणेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ते शिर्डी अशी पदयात्रा काढण्यात आली. सुमारे साडेचारशे किलोमीटर प्रवास करून ४०जणांचा जत्था पावसासाठी साईबाबांना साकडे घालणार आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी महाप्रसाद, भंडारा, अभिषेक करून दैवतांना साकडे घातले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Challenge of recovery in front of mahavitaran