पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा अर्थात पंढरीतील चंद्रभागा नदीला पूर आला आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने ३५० कुटुंबाना स्थलांतरीत केले आहे. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आल्यामुळे नदीला हा पूर आला आहे. पंढरीतील पुराचे हे पाणी शहरातील काही भागात जाण्याची शक्यता असून तेथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाने जरी उसंत घेतली असली तरी येथील चंद्रभागा नदीची पूरसदृश्य स्थिती कायम आहे. वीर धरणातून पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून हळूहळू कमी करण्यात आला आहे. सकाळी सात वाजता नीरा नदीत १५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे उजनी धरणातून सकाळी १० वाजता भीमा नदीत १ लाख ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

नीरा नदीचे आणि भीमा नदीचे पाणी अकलूज येथील संगम येथे एकत्रित होत आहे. या ठिकाणी सकाळी १० वाजता १ लाख ७८ हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. तर पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत १ लाख २० हजार क्युसेक पाणी वाहत आहे. नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यास सुरवात केली. येथील नदीकाठच्या दोन झोपडपट्टीतील नागरिकांना बुधवारी रात्रीपासून पालिकेने स्थलांतरीत करण्यास सुरवात केली आहे. जवळपास ३५० कुटुंबाना सकाळी सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले आहे. या सर्वाना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चहा, नाश्ता, दोन वेळेचे जेवण देण्यात येणार आहे. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणत सुरु आहे. त्यामुळे सायंकाळी शहरातील काही भागात पाणी जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेने तेथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे, प्रशासनाच्या सुचानाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.