scorecardresearch

“मी आता मूकभाषा शिकणार आहे”, वादग्रस्त वादानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले, “ती क्लिप…”

महाविकासआघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली. या वादानंतर चंद्रकांत पाटलांनी आता मी मूकभाषा शिकणार आहे, असं वक्तव्य केलं.

“मी आता मूकभाषा शिकणार आहे”, वादग्रस्त वादानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले, “ती क्लिप…”
चंद्रकांत पाटील

भाजपा नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’, असं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली. या वादानंतर चंद्रकांत पाटलांनी आता मी मूकभाषा शिकणार आहे, असं वक्तव्य केलं. ते शुक्रवारी (९ डिसेंबर) औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी माध्यमांचे आभार मानतो. कारण त्यांच्या माध्यमातून लोकांना ती क्लिप बघायला मिळाली. लोक म्हणत आहेत की यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे. ‘टेरर’ असणाऱ्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि तो म्हणाला यात नेमकं काय आहे? या व्हिडीओत आक्षेप घेण्यासारखं काय आहे हेच मी प्रसारमाध्यमांमधून लोकांना विचारलं. त्यावर लोकांचं समाधान झालं.”

“विरोधी पक्षांना ‘ध’चा ‘मा’ करणं एवढंच काम शिल्लक”

“या विषयावर वाद का निर्माण केला जातो हे माध्यमांनी शोधावं आणि समजलं तर मला कळवावं. विरोधी पक्षांना ‘ध’चा ‘मा’ करणं एवढंच काम शिल्लक आहे. यावर वाद निर्माण करून उलट विरोधक तोंडघशी पडले आहेत. अनेक दलित संघटना चंद्रकांत पाटील कसे चुकले नाहीत अशी पत्रकं काढत आहेत. त्यामुळे हे तोंडघशीच पडणार आहेत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

“सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला संस्थांना बळकटी द्यावी”

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “ही क्लिप पाहणारा तर हेच म्हणेल की चंद्रकांत पाटलांनी शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या. ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाही. त्यांनी लोकांकडून पैसे मागितले. आपण वर्गणी मागितली, सीएसआर मागितला असं आज म्हणतो. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील घरोघरी फिरून धान्य मागायचे.त्याचा हेतू हाच होता की, आता सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला संस्थांना बळकटी द्यावी लागेल.”

हेही वाचा : “फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळांसाठी भीक मागितली” म्हणणाऱ्या पाटलांचा मिटकरींकडून समाचार; म्हणाले, “तुम्ही मंत्रीपदासाठी…”

“मी आता मूकभाषा शिकणार आहे”

“असे वाद होत असल्याने मी आता मूकभाषा शिकणार आहे. त्यासाठी मला मदत करा,” असंही चंद्रकांत पाटील म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 23:27 IST

संबंधित बातम्या