भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांच्या दुरुपयोगाचे गंभीर आरोप केले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांकडून त्यांचा छळ होत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसेच आम्ही हा प्रकार सहन करणार नाही म्हणत चंद्रकांत पाटलांनी याविरोधात लढा देऊ, असं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला.”

“पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर”

“पोलिसांच्या छळानंतर अखेरीस गजानन चिंचवडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

“२०१४ मध्ये शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “२०१४ साली भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले. आम्ही हे सरकार आमच्या बळावर ५ वर्षे चालविले असते, पण शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले. काहीही करून सत्तेत घ्यावे यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते. हे आदित्य ठाकरे यांनी विसरू नये.”

हेही वाचा : “उत्तर प्रदेशात सात मार्चला शेवटचे मतदान झाले की मविआ सरकार पडेल कारण…”, चंद्रकांत पाटलांचा दावा

“मविच्या नेत्यांना एसटीच्या स्थानक व डेपोच्या जागा बळकावायच्या आहेत”

एसटीच्या संपाविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या स्थानक व डेपोच्या जागा बळकावायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा संप चिघळवला आहे. सत्ताधारी आघाडीच्या सापळ्यात एसटी कर्मचारी अडकले आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil serious allegations on ncp shivsena about misuse of police in pimpri chinchwad
First published on: 22-02-2022 at 09:23 IST