सोलापूर : संगीत, शाहिरी, साहित्य, चित्रपट, शिक्षण, वकिली, कामगार चळवळ अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आयुष्यभर साधी राहणी, उच्च विचारसरणीही जोपासली, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
विविध क्षेत्रांतील कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा करुणाशील समितीच्यावतीने चंद्रप्रकाश अमृतयात्री जीवनगौरव पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्यकर्मी सुनील गोडबोले व मसाप सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष, उद्योजक दत्ता सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.
ज्येष्ठ कामगार नेते, अभ्यासू माजी नगरसेवक कॉ. रामभाऊ गणाचार्य, मराठी शाहीर प्रा. डॉ. अजीज नदाफ, प्राचार्य वसंतराव बनसुडे, गांधीवादी प्राचार्य नरेश बदनोरे, ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, दलित चळवळीतील अभ्यासू निरीक्षक दत्ता गायकवाड, ज्येष्ठ समाजसेवक मल्लिकार्जुन पाटील, ॲड. जे. जे. कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, प्रा. डॉ. नसीम पठाण, अभिनेत्री सुशीला वनसाळे, विद्या काळे, निवृत्त उपजिल्हाधिकारी राजकुमार खरटमल आदींना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व पुरस्कार मानकऱ्यांचा मुक्तकंठाने गौरव करताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ॲड. धनंजय माने यांचे वडील, ज्येष्ठ फौजदारी वकील ए. तु. तथा अण्णासाहेब माने यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. माने वकील अतिशय विद्वान होते. त्यावेळी मी सोलापूर न्यायालयात चपराशी होतो. न्यायालयात कोणता वकील कसा वादविवाद करतो, त्याकडे बारकाईने बघायचो. अण्णासाहेब माने हे जेव्हा प्रतिवाद करू लागायचे, तेव्हा इतर वकील गर्दी करून स्तब्धपणे त्यांचा वादविवाद ऐकायचे. तोच वारसा आज धनंजय माने वकील चालवत आहेत, असे ते म्हणाले. करुणाशील समितीचे अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी प्रास्ताविक केले. तर मारुती कटकधोंड यांनी आभार मानले.