चंद्रपूरमधील दारुबंदीचा निर्णय अयोग्यच होता. दारुबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला, असे सांगत राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमधील दारुबंदीला विरोध दर्शवला. पण दारुबंदी उठवा, अशी थेट मागणी करणे त्यांनी टाळले आहे. स्वत:च्या मतदारसंघातील १५ हजार मतांपायी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूरमध्ये चार वर्षांपूर्वी दारुबंदी जाहीर झाली असून दारुबंदीनंतर जिल्ह्यात दारुची अवैधप्रमाणात विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांनी दारुबंदी उठवण्याची मागणी केली. ते म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:च्या मतदारसंघातील १५ हजार मतांपायी हा निर्णय घेतला. पण दारुबंदीचा निर्णय चुकीचाच होता.  या निर्णयामुळे अनेक जण बेरोजगार झाले.  दारुबंदीमुळे शासनाचा महसूल बुडाला असून जिल्ह्यात अवैध मार्गाने दारुची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना हा निर्णय पटलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठमोठे उद्योगधंदे आहेत. एका जिल्ह्यात दारुबंदी करुन काय साध्य होणार आहे. याऐवजी पूर्ण राज्यात किंवा देशातच दारुबंदी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दारुबंदीचा निर्णय हा माझ्या अंतर्गत येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दारुबंदी उठवा अशी मागणी करणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.

पाच वर्षांपासून चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा मुद्दा गाजत आहे. महिलांच्या आंदोलनानंतर २०१५ पासून चंद्रपूरमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. धानोरकर हे स्वत: देखील दारुविक्रीच्या व्यवसायात सक्रीय आहेत. दारुबंदीमुळे चंद्रपूरमधील त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. निवडणुकीतही भाजपाने याच मुद्द्यावरुन धानोरकर यांच्यावर टीका केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur congress mp suresh dhanorkar on liquor ban
First published on: 25-05-2019 at 17:21 IST