मानव-वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या वाढत्या झुंजीतील मृत्यू बघता चंद्रपूर वनवृत्तातील ६ ते ७ पूर्ण वाढ झालेले वाघ पैनगंगा अभयारण्यात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पाठविला आहे. या प्रस्तावाला एनटीसीएने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८८, तर चंद्रपूर वन वृत्तातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा या तीन वन विभागात ५८ वाघ व सुमारे २०० बिबटे आहेत. यातही एकटय़ा ब्रह्मपुरी वन विभागातच वाघांची संख्या ४५ ते ४७ आहे. बांबूच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात पाणवठे केल्यामुळे वाघ आणि बिबटय़ाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, असे चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व मुंबईच्या वाइल्डलाइफ कंझर्वेशन ट्रस्टचे म्हणणे आहे. ही संख्या अचानक वाढल्यामुळे जानेवारी ते मेदरम्यान मानव-वन्यजीव संघर्षांत नऊ जणांचा बळी, तर वाघांच्या संघर्षांत एका वाघिणीसह तीन वाघांचा मृत्यू झाला. या सर्व घटना केवळ त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळेच होत आहेत, त्यामुळेच चंद्रपूर वनवृत्तातील ब्रह्मपुरी वन विभागातील ६ ते ७ पूर्ण वाढ झालेले वाघ यवतमाळ-नांदेड जिल्ह्य़ातील पैनगंगा अभयारण्यात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एनटीसीए व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. भगवान यांच्याकडे पाठविला आहे. ब्रह्मपुरी व पैनगंगा अभयारण्य वाघांसाठी एकसारखेच आहे. त्यामुळे ब्रह्मपुरीतील वाघ तेथे गेले तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत. ३२५ चौ.कि.मी.च्या पैनगंगा अभयारण्यात ब्रह्मपुरीप्रमाणेच विविध वृक्ष आणि तृणक्षभी वन्यप्राणी मोठय़ा प्रमाणात आहेत. शिवाय मुबलक पाणी असल्यामुळेच हा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक विचार होत असल्याची माहिती आहे.