“नवीन सरकार येऊन नव्वद दिवस झाले. मात्र, गेली अडीच वर्ष तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे. आज सकाळी हडपसर ते सासवडच्या प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर सुप्रिया सुळे यांनी स्वत: गाडीतून खाली उतरत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंनी या घटनेचा व्हिडिओही ट्वीट केला आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येकडे सरकार लक्ष देत नसल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. या टीकेवर बावनकुळेंनी प्रत्युत्तर देत प्रतिप्रश्न विचारला आहे.

हेही वाचा- Video:…अखेर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सुप्रिया सुळे स्वतः उतरल्या रस्त्यावर

“सुप्रिया सुळे स्वत: खासदार आहेत. गेली अडीच वर्ष राज्यात तुमचं सरकार होतं. त्यामुळे आत्ताच्या सरकारकडे बोट दाखवून तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नसल्याचेही बावनकुळे म्हणाले. आत्ता तुम्ही गाव गाव आणि वसत्या-वसत्या फिरु लागल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना मांडण्यासाठी काही मुद्दे नाहीत त्यामुळे मीडियाचे लक्ष वेधणे आणि स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे, अशी टीका टीका बावनकुळेंनी केली आहे.

ट्वीट करत सुप्रिया सुळेंची नितीन गडकरींकडे मागणी

हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते. याचा नागरीकांना प्रचंड त्रास व मनस्ताप होत आहे. तरी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे.कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा”, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत केली आहे.