मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपाकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपाकडून ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा- शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रति सेनाभवन; मुंबईतील प्रत्येक प्रभागात असणार कार्यालय

भाजपाकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता आशिष शेलार यांच्याकडे असलेली मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आशिष शेलार आणि राम शिंदे यांचे नाव राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. मात्र, चंद्रकांत बावनकुळे यांच्या गळ्यात राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली. चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पद रिकामे होते. त्यानंतर आता भाजपाकडून कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाला चांगला विजय मिळाला होता. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता शेलारांकडे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा- “माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रीमंडळात स्थान नाही”, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजन म्हणाले…

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ताकदीनं पक्ष उभा करणार

“भाजपाच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिल्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी.नड्डा तसेच देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. भाजपाला महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष बनवून पुढे कसा नेता येईल यासाठी प्रयत्न करणार” असल्याचे बावनकुळे म्हणाले. तसेच “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ताकदीनं पक्ष उभा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. गेल्या २९ वर्षात पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी दिली होती तो विश्वास मी सार्थ करुन दाखवणार” असल्याचेही बावनकुळे म्हणाले.