महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी विदेशातून आणलेल्या चित्त्यांमुळे गायींमध्ये लम्पी आजार पसरला आहे. चित्त्यांच्या अंगावरील ठिपके आणि लम्पी आजारामुळे गायीला येणारे ठिपके सारखेच आहेत, अशा आशयाचं विधान नाना पटोले यांनी केलं. पटोलेंच्या या विधानानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोलेंच्या विधानाबाबत विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “मोंदींनी नायजेरीयावरून चित्ते आणल्याने देशात लम्पी आजार पसरला. चित्यांच्या अंगावर जसे ठिपके असतात, त्याप्रमाणे देशात गायीच्या अंगावर ठिपके दिसत आहेत, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. मागच्या दोन-चार महिन्यांमध्ये नाना पटोले ज्याप्रमाणे बोलत आहेत. त्यावरून असं दिसतं की, नाना पटोले यांनाच लम्पी आजार झाला आहे. त्यांनाच चांगल्या डॉक्टरांकडे पाठवण्याची गरज आहे. त्यांचा आजार तपासून घेण्याची गरज आहे” अशा शब्दांत बावनकुळेंनी टीकास्र सोडलं आहे. ते नागपुरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- मोची आणि मेट्रो कंपनीच्या चपलांवर हिंदू देवी-देवतांचे फोटो, भाजपा नेते अनिल बोंडेंकडून कारवाईची मागणी

बावनकुळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण खराब करणे, देशाच्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह बोलणे, हे नाना पटोले केवळ प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात. राहुल गांधींच्या अत्यंत जवळ जाण्यासाठी आणि आपलं अध्यक्षपद टिकवण्यासाठी ते अशा पद्धतीने बोलतात. त्यामुळे माझा नाना पटोलेंना सल्ला आहे, त्यांना लम्पी आजार झाला असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्यावा, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.

हेही वाचा- “मी त्यांचं मनापासून स्वागत करते, कारण…” आरआरएसच्या वरिष्ठ नेत्याचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule on nana patole statement lampi virus cheetah rmm
First published on: 03-10-2022 at 23:35 IST