भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीसंदर्भात भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेलं पाहिजे असंही म्हटलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे.

नक्की वाचा >> पत्राचाळ प्रकरण: पवारांच्या चौकशीच्या मागणीला BJP चा पाठींबा? पक्षाची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “…तर गृहमंत्री चौकशी करतील”

बावनकुळे यांना पत्रकारांनी, “जयंत पाटलांनी असं विधान केलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जरी जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना दिल्लीत अपॉइमेंट मिळणं कठीण आहे,” असं विचारत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचंड वजन आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी बैठका घेतलेल्या आहेत,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

पुढे बोलताना बावनकुळे यांनी, “मोदींनी जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील आम्ही त्या देऊ असं सांगितलं आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे आणि फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला, १५ दिवसाला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले पाहिजे,” असंही म्हटलं. “महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्राची मदत लागेल. केंद्राच्या मदतीशिवाय कुठलंही राज्य पुढे जाऊ शकत नाही,” असं बावनकुळे म्हणाले.

नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

याचबरोबर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. “केंद्राची मदत यांनी घेतली नाही. अडीच वर्ष महाराष्ट्राची यांनी खराब केली. अडीच वर्ष महाराष्ट्र विकासापासून यांनी वंचित ठेवला. केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. तसेच एकनाश शिंदे हे विकासकामं करणारे मुख्यमंत्री असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं. “विकास मागणारा व्यक्ती जर मुख्यमंत्री पंतप्रधानांना, केंद्रीय नेतृत्वाला भेटत असेल तर यांना कुठे तोंड फुटलंय? अडीच वर्षात यांनी काय केलं? मोदीजींनी त्यांना थोडी थांबवलं होतं,” असं बानवकुळे म्हणाले.

नक्की वाचा >> …म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा

महाविकास आघाडीने केंद्राच्या योजना राज्यात पूर्णत्वास नेल्या नाहीत असा आरोपही बानवकुळेंनी केला. “मोदी आणि केंद्राने दिलेल्या योजना या सरकारने होऊ दिल्या नाहीत. घरकुलचं काम बंद पाडलं, सर्वांसाठी अन्नाची योजना बंद पाडली. आठ ते दहा योजनांचं काम होऊच दिलं नाही,” असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी, “मला वाटतं त्यांनी आता जरा शांत बसलं पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांच्या विकासाच्या बुलेट ट्रेनचा आराखडा बघितला पाहिजे,” असंही विधान केलं.

“मी तर असं म्हणेन आम्हाला आनंद आहे की शिंदे आणि फडणवीस मोदींना भेटून महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहेत.
महाराष्ट्र पुढे नेत आहेत,” असंही बावनकुळे म्हणाले.