सोलापूर : विणकर पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव आज उत्साहात पार पडला. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह स्त्री-पुरुष भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
विजापूर वेस, सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवास प्रारंभ झाला. एका पारंपरिक बैलगाडीवर रथात श्री मार्कंडेय महामुनी विराजमान झाले होते. विजापूर वेशीत परिसर बहुसंख्य मुस्लीम इलाखा असल्यामुळे तेथील स्थानिक मुस्लिम बांधवांतर्फे रथोत्सवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा आदींच्या उपस्थितीत रथोत्सव निघाला.
दरम्यान, पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष श्रीनिवास, सचिव आत्माराम चिप्पा, मार्कंडेय मंदिराचे राघवेंद्र आरकाल आदींच्या सहकार्याने धार्मिक विधी पार पडले.
कोकणी लोक जसे नारळी पौर्णिमा साजरी करतात, त्या धर्तीवर पद्मशाली बांधव नुलुपुन्नमी साजरी करतात. नुलु म्हणजे सूत आणि पुन्नमी म्हणजे पौर्णिमा. पद्मशाली हे विणकर असल्याने या पौर्णिमेरोजी सुताची पूजा करतात. कापसाच्या राख्या तसेच जानवे परिधान करतात. मार्कंडेय मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पद्मशाली बांधवांची मांदियाळी दिसून आली. ‘जय मार्कंडेय..’ चा अखंड जयघोष सुरू होता. दर्शन घेतल्यावर भक्तगणांनी मंदिरातील पहिल्या मजल्यावर पुरोहितांकडून जानवे धारण करतानाच कापसाच्या राख्याही बांधून घेतल्या.
विविध पारंपरिक मार्गावरून विशेषतः पद्मशाली, तेलुगु भाषकांच्या भागातून हा रथोत्सव पार पडला. यात विविध कलापथक, शक्तिप्रयोग आदींचे आकर्षण होते. याशिवाय वारकरी संप्रदाय सहभागी झाला होता. मोठ्या आवाजातील उडत्या चालीवर आधारित तेलुगु गाण्यांच्या तालावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणाईला उधाण आले होते. मधूनच वरूणराजेकडून रथोत्सवावर जलवृष्टी होत होती.
एकीकडे हा सर्व उत्साही माहोल असताना दुसरीकडे रथोत्सवाच्या पुढे एका बैलगाडीत हातमागावर विणलेले कापड रात्री रथोत्सव फिरून आल्यानंतर श्री मार्कंडेय महामुनींना अर्पण करण्यात आले. हे विणलेले कापड एका वृद्ध विणकर कलाकाराकडून तयार करण्यात आले होते. यंदा प्रथमच कुचन प्रशालेतील विस्तीर्ण प्रांगणात तब्बल २६० फुटांची श्री मार्कंडेय महामुनींची भव्य चित्रकृती साकारण्यात आली. ही चित्रकृती साकारताना केवळ कला आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले नाही तर समाजातील एकता, श्रद्धा आणि संस्कृती बद्दलच्या प्रेमाचेही दर्शन घडले.