राज्यात बियाण्यांचे उत्पादन करून त्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना चांगलेच वावडे आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पद अधिकाऱ्यांना कायम नको असल्याचे दिसून येते. गेल्या ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. एका अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता कुणीही दोन वर्षांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. राज्यात मंगळवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये या पदावर कुणाचीही नेमणूक न झाल्याने पुन्हा एकदा हे पद अधांतरी लटकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला शहरात राज्याचे मुख्यालय असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली. बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कार्य महाबीजमध्ये होते. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. वरिष्ठ ‘आयएएस’ या पदावर काम करण्यास इच्छूक नसतात. या पदावर काम करण्यात ‘कमी’पणाची भावना असल्याने अधिकाऱ्यांचे इतरत्र बदलीसाठी प्रयत्न सुरू असतात. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच त्यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होत असल्याचा प्रत्यय गत दशकभरात वारंवार आला. महाबीजच्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३२ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक करण्यात आली. टी.बालारमण महाबीजचे पहिले ‘एम.डी.’ होते. पुढील काळात या पदावर अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी कार्य केले. व्ही. एस. धुमाल, डॉ.प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्ष १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. २०१० नंतर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर अधिकारी फारसे रमले नाहीत.

गेल्या ११ वर्षांमध्ये तब्बल १७ वेळा विविध अधिकारी व्यवस्थापकीय संचालक पदावर लाभले. यामध्ये बहुतांश वेळा अधिकाऱ्यांची बदलीवर महाबीजच्या ‘एम.डी.’ पदावर नेमणूक करण्यात आली होती, तर काही वेळा अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार होता. या कालावधीत अनिल भंडारी यांनी दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केला. इतर बहुतांश अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ८-१० दिवसांपासून ते दीड वर्षांपर्यंतच्या कार्यकाळात इतरत्र बदली करून घेतली. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकोला जिल्हाधिकारी असतांना जी.श्रीकांत यांच्याकडे तीन वेळा पदभार आला होता. पूर्णवेळ ‘एम.डी.’ म्हणून त्यांनी १७ फेब्रुवारीला पदभार स्वीकारला. आठवडाभरातच त्यांची नियुक्ती औरंगाबादमध्ये विक्री कर विभागात झाली. त्यांच्या जागेवर डॉ. राहुल रेखावार आले. ८ एप्रिलला ते रुजू झाल्यानंतर तीन महिन्यातच त्यांची कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महाबीजला व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यकाळ पूर्ण करणारा अधिकारी मिळत नसल्याने नफ्यात चालणाऱ्या या संस्थेच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

‘साईड ट्रॅक पोस्ट’? –

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक हे प्रवाहाबाहेरील पद असल्याचा समज असून यावर बदली म्हणजे कमी महत्त्वाचे पद दिल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये असते, अशी चर्चा आहे. शिवाय महाबीजचे मुख्यालय अकोला असल्याने याठिकाणी येण्यास अधिकारी इच्छूक नसतात. त्यामुळे या पदावर नियुक्ती होताच अधिकाऱ्यांचे बदलीसाठी प्रयत्न सुरू होतात.

लवकरच त्या पदावर अधिकाऱ्यांची नेमणूक होईल –

महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर विविध अधिकाऱ्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. अनेक अधिकारी त्या पदासाठी इच्छूक आहेत. काही अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक समस्या असतात. शिवाय प्रशासकीय कारणावरून बदल्या होत असतात. लवकरच त्या पदावर अधिकाऱ्यांची नेमणूक होईल, असं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे चेअरमन एकनात डवले यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chartered officers in the state does not want to mahabeej md post msr
First published on: 15-07-2021 at 19:00 IST