अहिल्यानगरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक श्री क्षेत्र चोंडी येथे आज, मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचे स्वागत खास धनगर समाजाची परंपरा असलेली काठी, घोंगडे, अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा लोकमातेची हे पुस्तक, अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती, शाल देऊन स्वागत केले. भोजन व्यवस्थाही खास प्रकारच्या कांस्य धातूची थाळी व कांस्य धातूच्या ग्लास-वाट्यातून करण्यात आली होती. भोजनासाठी पुरणपोळी, आमरस, कर्जत गावाची ओळख असलेली शिपी आमटी, मासवडी अशा एकुण १८ प्रकारच्या खाद्यपदार्थ होते.
मंत्रिमंडळ बैठक पहिल्यांदाच ग्रामीण भागात होत आहे. यासाठी चोंडी गावात खास व्यवस्था करण्यात आली आहे. अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावरील चापडगाव येथून सुमारे ५ किमी अंतरावर श्री क्षेत्र चोंडी हे तिर्थक्षेत्र आहे. चापडगाव येथूनच पोलिसांनी बंदोबस्तासाठी बॅरेकेटींग केले होते. बैठकीसाठी येणाऱ्यांची ठिकठिकाणी तपासणी केली जात होती. त्यानंतरच त्यांना पुढे जाऊ दिले जात होते. चापडगाव, चोंडी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या स्वागताचे फलक उभारले होते. पारंपरिक ढोल ताशाने स्वागत करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकस्थळी सभापती शिंदे व चोंडी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मंत्र्यांचा सत्कार धनगर समाजाची परंपरा जपणारी घोंगडी, काठी यासह अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती, अहिल्यादेवी होळकर गौरवगाथा लोकमातेची हे पुस्तक व शाल देऊन करण्यात आला. स्वागताची जबाबदारी कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर सोपवण्यात आली होती.
मंत्रिमंडळ बैठक कक्षाशेजारी भोजन कक्ष उभारण्यात आला होता. भोजनामध्ये पुरणपोळी त्यावर गावरान तुप, आमरस, शिपी आमटी, ताक, मासवडी, कोथिंबीर वडी, कांदा भजी, खारे वांगे, वांगे भरीत, हुलगे उसळ, हिरव्या मिरच्याचा ठेचा, ज्वारी व बाजरी भाकरी, अशा एकुण १८ खाद्यपदार्थांचा आस्वाद मंत्र्यांनी घेतला. मंत्र्यांना हे भोजन कास्य धातूच्या ताटात वाढण्यात आले होते. त्यासोबतच कास्य धातूचे ग्लास व वाट्याही होत्या. एका कास्य थाळीची किंमत ३,९९९ रूपये आहे. मंत्रिमंडळाच्या भोजनासाठी केटरर्स चालकाने खास कास्य धातूचे १०० नग विकत घेतले. ही भोजन व्यवस्था मुंबईतील ‘मिनी पंजाब’ या केटरर्सकडे सोपविण्यात आली होती. विविध डाळींच्या मिश्रणातून तयार होणारी रस्सेदार शिपी आमटी ही खास कर्जतची ओळख आहे. ही आमटी कर्जतमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. स्थानिक पद्धतीप्रमाणे शिपी आमटी तयार करण्याची जबाबदारी मिनी पंजाब केटरर्सने स्थानिक महिलांवर सोपवली होती. ती त्यांच्याकडून तयार करून घेतली.
मंत्रिमंडळ बैठक व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे गेल्या दोन दिवसांपासून चोंडीमध्ये मुक्काम ठोकून होते. या सर्व व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ हजारापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून तैनात करण्यात आले होते. मंत्रिमंडळ बैठक व्यवस्थेकडे सुरक्षा पास असल्याशिवाय कोणालाही फिरकू दिले जात नव्हते, चोंडी गावासह परिसरातील सोलापूर महामार्गावरील सर्व हाॅटेल, धाबे, नाष्टा सेंटर बंद ठेवले होते. बैठक व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आलेले कर्मचारी व पोलिसांसाठी ठेवलेला सकाळचा नाष्टाही अपूरा पडला. परिसरातील हाॅटेल बंद असल्याने त्यांना धावाधाव करावी लागली. मंत्रीमंडळ मंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चौंडी येथे सूतगिरणीचे भूमिपूजन झाले. त्यानंतर चौंडी गावात येऊन त्यांनी अहिल्यादेवी स्मारकामध्ये जाऊन दर्शन घेतले.