चांगले बी-बियाणे देण्यासाठी व्यवस्था करतानाच बनावट बियाणे, खते व कीटकनाशके यांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. २०१५-१६ साठी जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक शनिवारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी महाजन यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
बैठकीस सर्वश्री आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांच्यासह विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते. अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीत पीक विमा योजनेतून त्यांच्या हाती तोकडी रक्कम पडते. त्याचा उपयोग होत नाही. यामुळे शासनामार्फत लवकरच नवीन पीक विमा योजना सादर केली जाणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले. शेतीमध्ये शेडनेट, ठिंबक सिंचन वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण अमलात आणले जात आहे. शेडनेटसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. दुष्काळ व टंचाईतून राज्याला मुक्त करण्यासाठी शासन जलयुक्त शिवार अभियान योजना राबवत आहे. र्सवकष उपाय करून गाव टंचाईमुक्त होतील. शेतीसाठी पाण्याच्या अतिवापराने मातीचा पोत खराब होतो. ठिंबक सिचनाच्या माध्यमातून कमीत कमी पाणी वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या वेळी आ. डॉ. आहेर यांनी गतवर्षीप्रमाणे कांदा बियाण्यांचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली तर आ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी केलेल्या खर्चाचे अनुदान त्वरित देण्याची मागणी केली. विभागीय आयुक्त डवले यांनी पिकांच्या उत्पादन घेण्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचे प्रयोग केले जाणार असल्याचे सूचित केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2015 रोजी प्रकाशित
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी
चांगले बी-बियाणे देण्यासाठी व्यवस्था करतानाच बनावट बियाणे, खते व कीटकनाशके यांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

First published on: 10-05-2015 at 01:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating farmers criminal offence