नागपूर : वैदर्भीय खाद्यसंस्कृतीची साऱ्या जगात चर्चा होत असताना ‘जी- २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी खास पेशवाई पद्धतीची पंगत राहणार असून त्यात वऱ्हाडी खाद्यपदार्थासोबत १२ प्रकारच्या गोड पदार्थांची मेजवानी दिली जाणार आहे. वेगवेगळी खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडे या विदेशी पाहुण्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था असून त्यासाठी तेलंगखेडी उद्यानात गेल्या तीन दिवसांपासून तयारी सुरू आहे.
यासंदर्भात विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, एरवी टेबलवर खाद्यपदार्थ ठेवले जात असताना विदेशी पाहुण्यासाठी खास पेशवाई पद्धतीची मेजवानी राहणार आहे. ४०० लोकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी १२० तयारीसाठी आहे. महाराष्ट्रीय परंपरेनुसार भारतीय बैठक मांडून चौरंगावर चांदीच्या ताटात पेशवाई पद्धतीने पंगत राहणार आहे. खास इंदौरवरून ही चांदीचे ताट वाट्या मागवण्यात आल्या आहे. उसाचा रसासाठी कोल्हापूरवरून रसचक्र मागवण्यात आले आहे. पेशवाई पद्धतीत एकाचवेळी शंभर लोक बसू शकतील अशी व्यवस्था राहणार आहे. १२०० किलो वेगळ्या पद्धतीचा चिवडा तयार केला जाणार आहे. याशिवाय उकडीचे मोदक पुरणपोळी, गोळाभात, वांग्याचे भरीत आदी पदार्थ राहणार आहे.
हेही वाचा – विदर्भ संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईच्या कबड्डीपटूची १.७० लाखांनी फसवणूक
विदेशी पाहुण्यांना आपल्या खास वैदर्भीय शैलीतील खाद्यपदार्थांची ओळख करून देण्याची आणि त्यांचा वैदर्भीय पद्धतीने पाहुणचार करण्याची संधी मिळाली त्यामुळे वेगळा आनंद आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली असल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले. उद्या रात्री तेलंगखेडी उद्यान येथे पाहुण्यांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमासोबत सुग्रास, स्वादिष्ट आणि रूचकर भोजन राहणार आहे. कॉन्टिनेन्टल, अस्सल वऱ्हाडी, दक्षिण भारतीय पदार्थ असणार आहेत. विदेशी पाहुण्यांना स्वागत पेय म्हणून अंबाडी सरबत, आम पान, सोल कढीसह सॉफ्ट ड्रिंक्स – कोक/मिरिंडा/माझा देण्यात येणार, तर सूप व्हेजमध्ये टोमॅटो सार, लिंबू धणे/ गरम आणि आंबट आंबिल असणार आहे.
हेही वाचा – ४२.५ टक्के भागात दररोज १० ते २० चिमण्यांचे दर्शन; अकोल्यात ऑनलाइन चिमणी गणना
मांसाहारी सूपमध्ये पाया सूप, मका सूप, चिकन सूप / चिकन क्लियर सूप राहील. ‘स्टार्टर्स’मध्ये पनीर टिक्का, कुरकुरीत व्हेज, मिनी आलूबोंडा व हुरडा तर मांसाहारी स्टार्टर्समध्ये ‘चिली चिकन’, ‘फिश फिंगर’ व मटण राहणार आहे. खास वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद मिळावा यासाठी वऱ्हाडी जेवणासोबत दाक्षिणात्य पदार्थही असणार आहेत. शाकाहारी जेवणात सांबर वडी, पाटोदीरस्सा भाजी, झुणका, वांगेभरीत, पनीर बटर मसाला, मसाला भात, साधा भात, ताक/मठ्ठा, आमटीचा समावेश आहे. तर मांसाहारात ‘चिकन करी’, सावजी अंडाकरी, फिश करी यासोबत तवा रोटी, तंदुरी रोटी, नान, मटका रोटी तसेच ज्वारी/बाजरीची भाकरी असेल. याशिवाय ‘कॉन्टिनेन्टल’ पदार्थही राहणार आहे.