सोलापूर : विजापूर रस्त्यावरील वादग्रस्त १७ मजली ‘पनाश टॉवर’ निवासी संकुल उभारलेल्या गॅलोर डेव्हलपर्स कंपनीने पाच वर्षांपूर्वी अनामत म्हणून सोलापूर महापालिकेत भरलेले चार कोटी रुपयांचे धनादेश पालिका तिजोरीत तसेच पडून आहेत. तर दुसरीकडे ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे आढळून आले आहे.
२०१३ साली दहा मजली निवासी संकुलाच्या बांधकामाचा परवाना मिळविलेल्या गॅलोर डेव्हलपर्स कंपनीने नंतर २०२१ साली वाढीव सात मजली निवासी संकुलासाठी परवाना मागितला होता. त्यापोटी कंपनीने चार कोटी रुपयांचे धनादेश महापालिका प्रशासनाकडे भरले होते. परंतु, पाच वर्षांपासून हे धनादेश न वटविता पालिकेच्या तिजोरीत तसेच पडून आहेत. ही माहिती स्वतः पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पुढील तीन दिवसांत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, पनाश टॉवरची उभारणी करणारी गेलोर डेवलपर्स कंपनी दिवाळखोरीत गेली असून, याबाबत महापालिकेच्या विधान सल्लागारांमार्फत कंपनीविरुद्ध लवादाकडे दावे दाखल करून संपूर्ण रकमांची वसुली केली जाईल, असे नगर रचना विभागाचे उपसंचालक मनीष बिष्णूरकर यांनी स्पष्ट केले आहे.
पनाश टॉवर सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, यात मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त आशीष लोकरे यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर त्या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी संबंधित ११ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्याची मुदत संपली असताना त्यातील काही मोजक्या अधिकारी यांनी म्हणणे सादर केले आहे. उर्वरित अधिकारी यांनी आणखी मुदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पनाश टॉवरच्या वादात आता सुरक्षा ठेवपोटी जमा झालेले चार कोटींचे धनादेश न वटविता महापालिकेत तसेच पडून राहिल्याने त्यातील संशय वाढला आहे.
कंपनीने काहीही गैर केले नाही
पनाश टॉवर उभारण्यासाठी विकास शुल्क आणि वाढीव चटई क्षेत्रापोटी सोलापूर महापालिकेला सुरक्षा ठेव म्हणून चार कोटींचे धनादेश दिले होते. बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी या रकमा भराव्या लागतील. कंपनी महापालिकेची सध्या थकबाकीदार नाही. यात कंपनीने काहीही चुकीचे केले नाही.-अमित थेपडे,संचालक, गॅलोर डेव्हलपर्स कंपनी