“लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत खटपट होता कामा नये”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत छगन भुजबळ म्हणाले, “आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळालाच पाहिजे.” भुजबळ यांनी यावेळी, भारतीय जनता पार्टीने आपल्याला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिल्याची आठवण करून दिली. दरम्यान, “विधानसभेवेळी लोकसभेसारखं चित्र राहणार नाही” असं उत्तर प्रफुल्ल पटेल (अजित पवार गटातील नेते) यांनी दिलं. तर, “विधानसभेला सर्वांचाच मानसन्मान केला जाईल, असा शब्द भाजपाने आपल्याला दिला आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत आम्हाला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत जी खटपट झाली, ती खटपट विधानसभा निवडणुकीत होता कामा नये. महायुतीमध्ये आपल्याला योग्य तो वाटा मिळायला हवा. आपण महायुतीत आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. लोकसभेला जी खटपट झाली ती खटपट पुढे होता कामा नये. ८०-९० जागा मिळाल्या तर कुठे आपले ५० ते ६० आमदार निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या, मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार? असं होता कामा नये”

छगन भुजबळांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या बैठकीत प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनीदेखील भुजबळांची समजूत काढली. पटेल म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखं चित्र राहणार नाही एवढी खबरदारी अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांच्यासह पक्षातील इतर जबाबदार व्यक्तींनी देखील या गोष्टीची काळजी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळणाऱ्या जागांमध्ये नक्कीच वाढ होईल. आपले आत्ता किती विद्यमान आमदार आहेत किंवा नाहीत हा विषय त्या चर्चेत नसेल. जागा वाटपाच्या चर्चेत आपण सर्वजण सहभागी असणार आहोत.”

हे ही वाचा >> Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, डॉक्टरांच्या अटकेनंतर काँग्रेसचा हसन मुश्रीफांवर आरोप; म्हणाले, “अपघाताच्या रात्री…”

दरम्यान, अजित पवार म्हणाले, “मागील विधानसभा निवडणुकीत आपण ५४ जण निवडून आलो होतो. आता २८८ जागांचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यावेळी काय होईल याची आपणा सर्वांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. याबद्दल माझं दुमत नाही. मात्र जागावाटपाबाबत काळजी करू नका. कारण जागावाटपात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल.”