Chhagan Bhujbal backs Phule Movie over : महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित येऊ घातलेल्या ‘फुले’ या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यांची री ओढली आहे. परिणामी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. या चित्रपटामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलं आहे. या चित्रपटातील ब्राह्मणांबाबतचं चित्रण करणारे प्रसंग वगळावेत अशी मागणी केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ हे या चित्रपटाच्या बाजूने उभे राहिले आहेत. फुले चित्रपटातील एकही प्रसंग वगळू नये अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे.

“फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये”, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ म्हणाले, “त्यावेळी (फुले यांच्या काळात) सगळेच ब्राह्मण हे फुलेंविरोधात नव्हते. केवळ काही कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला होता.” फुले चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणाले, “फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. हा चित्रपट बनवणाऱ्या लोकांनी चित्रपटात सत्य दाखवलं आहे. ते दाखवत असताना आम्ही आजच्या ब्राह्मणांना अजिबात सॉफ्ट टार्गेट करत नाही. त्यावेळी सगळेच ब्राह्मण हे फुलेंविरोधात नव्हते. अनेकांनी स्त्री शिक्षणासाठी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मदत केली होती. मात्र, काही कर्मठ ब्राम्हण फुलेंच्या विरोधात होते. त्यांच्याबरोर आमच्या बहुजन समाजातील अंधश्रद्धेत बुडालेले लोकही होते, ज्यांनी फुले दाम्पत्याला विरोध केला होता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाला होणारा विरोध अनाठायी : भुजबळ

छगन भुजबळ यांनी यापूर्वी देखील या चित्रपटासाठी ठाम भूमिका घेतली होती. ते म्हणाले होते, “आपण इतिहास विसरत चाललो आहोत. महात्मा फुले यांचं लेखन, संपादन व कृती ही त्या वेळच्या कर्मठ ब्राह्मणांविरोधात आहे. त्यांचा लढा ब्राह्मणांविरोधात नव्हे, तर ब्राह्मण्यवादाविरोधात आहे. हे जाणून घेण्यासाठी ‘फुले’ चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे. जातीयवाद करून इतरांना कमी लेखणाऱ्यांनी हा चित्रपट पाहणं आवश्यक आहे. ‘फुले’ चित्रपटाला अनाठायी विरोध करण्यापेक्षा त्या वेळचा इतिहास समजून घेतला पाहिजे.”