Chhagan Bhujbal meets Bharat Karad’s family in Latur : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी या गावातील भरत महादेव कराड (३५) या व्यक्तीने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, आज (१२ सप्टेंबर) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांगदरी या गावी जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तसेच यावेळी भुजबळ यांनी कराड यांच्या गावात जमलेल्या लोकांना संबोधित केलं. भुजबळ म्हणाले, “आम्ही भरतचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढू.”
छगन भुजबळ म्हणाले, “आरक्षण मिळवण्यासाठी भरत कराडसारख्या तरुणांनी आहुती दिली होती. आजही ओबीसी तरुण आरक्षण टिकवण्यासाठी लढतोय. आम्ही सरकारकडे केवळ एकच गोष्ट मागतोय. तुम्हाला ज्यांना आरक्षण द्यायचं आहे त्यांना द्या. परंतु, आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करू नका. मराठा समाजासाठी ५० टक्के आरक्षण मोकळं आहे, त्यानंतर केंद्र सरकारने EWS हे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण सुरू केलं आहे. त्यापैकी ९० टक्के वाटा मराठा समाजाने घेतला आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. मुळात आमच्याकडे १७ टक्के आरक्षण शिल्लक आहे. या गरिबांचं आरक्षण हिरावू नका.”
न्यायालयाने स्पष्ट केलंय की मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही : भुजबळ
अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, “मराठा समाजाने बऱ्याचदा आरक्षणाची मागणी केली आहे. परंतु, आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं. तरी ते ऐकायला तयार नाहीत. आता ते म्हणतात, कुणबी प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीने दोन वर्षे काम करून नोंदी असलेल्या दोन लाख कुटुंबांना हे प्रमाणपत्र दिलं. तेव्हा आम्ही गप्प होतो. आता ते म्हणतात मराठा समाजाला प्रमाणपत्र द्या.”
छगन भुजबळांचं मराठा समाजाला आवाहन
छगन भुजबळ म्हणाले, “माझं मराठा समाजाला एकच सांगणं आहे की तुम्हाला वेगळं आरक्षण हवं असेल तर ते घ्या, हवं तितकं घ्या, आमची त्यावर हरकत नाही. आमचं आहे ते आरक्षण ठेवा. आम्ही ५४ टक्के आहोत. परंतु, आम्हाला २७ टक्के आरक्षण दिलं आहे. ते आमचं आम्हाला राहू द्या. आमचं हे आरक्षण टिकावं यासाठी आम्ही लढा देत आहोत. आमच्यात धनगर, माळी, कोळी, वंजारी, साळी, कुंभार, लोहार अशा अठरापगड जाती आहेत. आमचं आरक्षण आम्हाला पुरेसं नाही. त्यात आणखी भर नको.”