Chhagan Bhujbal Oath Ceremony : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ हे मंगळवारी (२० मे) सकाळी १० वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम मुंबईतील राजभवनात मंगळवारी पार पडणार असल्याचं बोललं जात आहे.
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना आधी स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांच्यावर त्यांनी टीका केली होती. मात्र, अखेर छगन भुजबळ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता राजकीय पुनर्वसन करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून मला राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता शपथविधी होईल, असं त्यांनी म्हटलं असल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका पाहता आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
छगन भुजबळांना कोणतं खातं मिळणार?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता धनंजय मुंडेंकडे जे खातं होतं तेच खातं अर्थात अन्न व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.