सारथी संस्था आणि तिच्या स्वायत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा सारथी संस्थेवरून सरकारला धारेवर धरलं आहे. संभाजीराजे भोसले यांनी सरकारवर प्रश्नांचा पाऊस पाडला, “लोकशाहीमध्ये समाज सर्वात मोठा असतो. पण तो जागृत असला पाहिजे. जागृत झालेला समाज एकवटतो. एक झालेल्या समाजाची फार मोठी ताकद असते, त्यापुढे मोठमोठ्या सत्तांना झुकाव लागतं. यातूनच मराठा समाजाने, आरक्षण मिळवलं, अनेक संस्था मिळवल्या. अजूनही अनेक गोष्टी समाजाला मिळवता येतील”, असं म्हणत मराठा समाजाला पुन्हा एक होण्याचं आवाहन केलं आहे.
काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे भोसले?
सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे व तसेच सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना आहे. मराठा समाजाने संघर्षाने मिळवलेली आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने अस्तित्वात आलेली ही संस्था आहे. याबाबत प्रत्येक वेळी केवळ आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल करून ती बंदच करून टाकणार आहेत का? तर तसेही सांगा. संबंधित मंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला अपेक्षित आहेत.
मराठा समाजाच्या वतीने पुण्यात आंदोलन केलं, तिथे जी आश्वासने सरकारच्या वतीने समाजाला दिली गेली, त्यापैकी किती पूर्ण केली? स्वायत्ता राखणार असा शब्द दिला होता, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का? संस्थेमध्ये गैरव्यवहार केला असा आरोप करून संस्था बदनाम केली गेली. तिची चौकशी सुद्धा केली, त्याचे पुढे काय झाले? की तो केवळ फार्स होता? मुळात सारथी संस्था कोण कोणत्या उद्दिष्टांकरिता अस्तित्वात आली होती? आणि आता कोणती उद्दिष्टे समोर आणली जात आहेत?
एखादी संस्था जी अस्तित्वात येऊन केवळ १ वर्ष झाले होते, तिच्या पाठीमागे काही लोक एवढं हात धुवून लागले, की तिला जर्जर अवस्थेत नेऊन ठेवलं. कुणी एका अधिकाऱ्याने किंवा मंत्र्याने गैरव्यवहार केला म्हणून शासनाच्या किती मंत्रालयाना टाळे लावले? याचाही हिशोब झाला पाहिजे ना कधीतरी! पण एखाद्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हातात घेऊन उभी राहत असलेल्या संस्थेचे लगेच पंख छाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.
सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे!
व तसेच सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना आहे. pic.twitter.com/5Us4wf5KDg
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 3, 2020
लोकशाहीमध्ये समाज सर्वात मोठा असतो. पण तो जागृत असला पाहिजे. जागृत झालेला समाज एकवटतो. एक झालेल्या समाजाची फार मोठी ताकद असते, त्यापुढे मोठमोठ्या सत्तांना झुकाव लागतं. यातूनच मराठा समाजाने, आरक्षण मिळवलं, अनेक संस्था मिळवल्या. अजूनही अनेक गोष्टी समाजाला मिळवता येतील. सारथीच्या बाबतही समाजाला जे पाहिजे तेच होईल. संस्था ज्यांच्या नावाने आहे, त्या राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं हे माझं कर्तव्य समजतो. सारथीच्या स्वायत्ततेसाठी आणि मराठा समाजातील भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन करतो.