सातारा:राज्यातील पर्यटन स्थळे,गड किल्ले,विस्तीर्ण समुद्रकिनारा, पश्चिम घाटातील दुर्मिळ जैव संपदा, लोकसंस्कृती, ग्राम संस्कृती आणि खाद्य संस्कृती या सर्व बाबी विचारात घेऊन राज्याला पुढील काही वर्षात पर्यटनाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाबळेश्वर येथे दिली.
महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन व पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, आदिती भारद्वाज,वैशाली कडुकर, मुख्याधिकारी योगेश पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात आज अनेक छोटी मोठी पर्यटन स्थळे, पाच जागतिक वारसा स्थळे, व्याघ्र प्रकल्प, प्रेक्षणीय गड किल्ले, साडेसातशे किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, मोठी लोक,ग्राम आणि खाद्य संस्कृती असा मोठा विस्तीर्ण पर्यटनाचा खजिना उपलब्ध असताना सुद्धा देशाच्या पर्यटनाच्या नकाशावर आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. मात्र यापुढे पर्यटन स्थळांचा पुरेपूर वापर करून आपण पहिल्या क्रमांकाला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.काही हजार कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीतून आपण शेकडो रोजगार उपलब्ध करू शकतो. मात्र फक्त शंभर कोटींच्या पर्यटनाच्या गुंतवणुकीतून आपण दहा हजार रोजगार उपलब्ध करू शकतो. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून ही आपण रोजगार उभे करणार आहोत.
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयासारख्या उपलब्ध नैसर्गिक व पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करून मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बोट क्लब, स्कुबा ड्रायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स ला परवानगी दिली आहे.देशातील पहिलं स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र राज्यात उभारला आहे. काही किरकोळ सुविधांच्या माध्यमातून आपण जागतिक आणि देशातील पर्यटकांना आकर्षित करू शकतो.गणपती उत्सव, गणपती विसर्जन मिरवणूक, पंढरीची वारी, आषाढी एकादशी, राज्यात होणारे उत्सव, महोत्सव,मोठ्या जत्रा तेथील संस्कृती अशा अनेक बाबींचा वापर आपण पर्यटनासाठी उपयोग करू शकतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करण्याची, अद्यावत संकेतस्थळावर सर्व बाबी उपलब्ध करून देण्याची व सहली आयोजित करणाऱ्या व्यवस्थापकांबरोबर संवाद साधण्याची सूचना पर्यटन विभागाला त्यांनी केली.आपले संगीत आणि लोकगीते ऐकून जगातून पन्नास टक्के महसूल देशाला मिळतो असे सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर पर्यटन महा महोत्सव होत असल्याने आनंद झाल्याचे सांगितले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वर्षातून एक ते दोन दिवसांचे विधिमंडळाचे अधिवेशन महाबळेश्वरला बोलाविण्याची सूचना केली.शंभूराज देसाई यांनी प्रास्ताविक केले.