Manikrao Kokate Rummy Video: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. हे अधिवेशन आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये केलेली मारहाण, त्यानंतर भाजपा आमदार गोपिचंद पडळकर व राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारहाण आणि शेवटी अधिवेशन संपल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात कथितपणे रमी खेळत असल्याच्या व्हायरल व्हिडिओने गाजले.

दरम्यान, कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातून त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील लोकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, कोकाटे रमी खेळत असल्याच्या कथित व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रतिक्रिया दिली होती. यावर आता माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केले आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना कोकाटे म्हणाले की, “बरोबर आहे. मी मुख्यमंत्र्यांशी अद्याप या विषयावर बोललो नाही. मी याबाबत त्यांना माहिती दिली नाही आणि चौकशीही झाली नाही. त्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावर विश्वास ठेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचे दिसत आहे. पण त्या प्रकारचे कोणतेही काम मी केलेले नाही. मी रमी खेळलो नाही आणि खेळणं बरोबरही नाही. मी २५ वर्षांपासून विधानसभेत आहे. त्यामुळे इथे काय करावे, काय करू नये, तसेच सर्व कायदे आणि नियम मला माहिती आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित रमी व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मला वाटतं की ही बाब अतिशय चुकीची आहे. विधानभवनात आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी गांभीर्याने बसणं आवश्यक आहे. एखाद्या वेळी असं होतं की तुम्ही कागदपत्रं वाचता, इतर काही गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही योग्य नाही. अर्थात, कोकाटे यांनी रमी खेळत नसल्याचा खुलासा केला. अचानक ती पॉप-अप झाली वगैरे सांगितलं आहे. पण, जरी त्यांनी जे काही सांगितलं असलं तरीही, जे घडलं आहे ते आम्हाला भूषणावह नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.