मुंबई : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राचा शासकीय आदेश रद्द करण्यात आला असला तरी राज्यात त्रिभाषा सूत्र लागू होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून लागू करायचे याचा निर्णय डॉ. नरेेंद्र जाधव समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र रद्द करण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला होता. महायुती सरकारला माघार घेण्यास भाग पाडल्याबद्दल शिवसेना व मनसेने त्याचे श्रेय घेतले होते. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्रिभाषा सूत्रावरून चर्चा सुरू असतानाच ‘एक गोष्ट मी निश्चित सांगतो… राज्यात तीन भाषांचे सूत्र लागू होईलच,’असे फडणवीस यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
अहवालानंतर अंमलबजावणी
त्रिभाषा सूत्र कधीपासून लागू करायचे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह होते. एका विशिष्ट वयात अनेक भाषा मुले शिकू शकतात. ८ ते १० या वयोगटात मुलांची आकलनशक्ती वाढते. तसेच बौद्धिक विस्तार होतो, असे संशोधनाचे निष्कर्ष आहेत. आमच्या दृष्टीने हा विषय प्रतिष्ठेचा नाही. यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात त्रिभाषा सूत्र लागू होणार हे निश्चित फक्त ते कोणत्या इयत्तेपासून लागू करायचे याचा निर्णय जाधव समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावरच ठरविण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
त्रिभाषा सूत्रावरून फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेवरून भाजप आणि रा. स्व. संघाच्या धोरणानुसार महाराष्ट्रात हिंदी लागू केली जाणार हे स्पष्टच होत आहे. – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष