राज्याचे नवे औद्योगिक धोरण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेल्या गुंतवणुकीच्या नव्या संधींची माहिती देऊन परदेशी उद्योगांना, तसेच गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगळवारी पहाटे स्वित्झर्लंड येथील डाव्होस येथे रवाना झाले. तेथील क्लॉस्टर्स या शहरात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४४ वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीस भारतातून निमंत्रित करण्यात आलेले पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
२२ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱया या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री विविध देशांतून आलेले मान्यवर उद्योगपती त्याचप्रमाणे नेत्यांना भेटतील. यामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, संरक्षण क्षेत्रातील बलाढय सॅफ्रान, युनिलिव्हर, कारगिल या एफएमसीजी कंपन्या इत्यादींचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रस्तावित विमानतळाच्या आराखडयासंदर्भात हे शिष्टमंडळ झुरिक विमानतळातील सोयी सुविधांची पाहणी करतील आणि तेथील अधिका-यांशी चर्चा करतील.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या शिष्टमंडळामध्ये उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांचा समावेश आहे.