महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, हे वर्ष राज्याला सुख-समृद्धी, भरभराटीचे आणि शांततेचे जावो, असे साकडे विठ्ठल चरणी घातले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते झाली. महापूजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात कालपासून सर्वत्र चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. हे वर्षे जनतेला सुख-समृध्दीचे जावो अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.