गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दिनांक २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पुकारलेल्या बंदला दुर्गम-अतिदुर्गम भागासह जिल्हाभरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मौजा ग्यारपत्ती, मौजा गट्टा(जा),मौजा हेडरी, मौजा कोठी इत्यादी दुर्गम भागांसह इतर भागातील नागरिकांनी या विरोधात एकजूट दाखवली आहे. नागरिकांनी नक्षलवादाविरोधात एकत्र येत नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यत नक्षल सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत जोरदार विरोध दर्शवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल विरोधी बॅनर लावून नक्षलवाद्यांना २८ जुलै रोजी नक्षल सप्ताह म्हणून आम्ही आदिवासी जनतेने कशासाठी पाळावा? असा खडा सवाल केला आहे. नक्षलवाद्यांकडून २८ जुलै रोजी नक्षल सप्ताहात अंतर्गत खून , जाळपोळ व दहशत निर्माण करून आदिवासी जनतेला भयभीत केले जाते. असा नक्षल सप्ताह आमच्या काय कामाचा?आजपर्यंत आदिवासी जनतेच्या विकासासाठी नक्षलवाद्यांनी काय केले?असा सवाल देखील जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी नक्षलवाद्यांना केला आहे. तसेच आम्हां आदिवासी समाजाकडून कोणताही नक्षल सप्ताह पाळला जाणार नाही, असे ठणकावून सांगत. नक्षलवादास विरोध दर्शविणारे बॅनर उभारण्यात आले आहेत. बॅनरच्या माध्यमातून नागरिकांनी नक्षलवादी आदिवासी जनतेवर करत असलेल्या अन्याय, अत्याचाराबद्ल निषेध नोंदविला आहे.

नक्षलवाद्यांनी आजपर्यंत जिल्ह्यातील ५३४  निरपराध नागरिकांचा खून केला आहे. दहशत पसरवून आपले आर्थिक हित जोपासणे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नक्षलवादी आजतागायत काम करत आले आहेत. त्यांचा खरा चेहरा दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनतेसमोर सातत्याने येत असल्याने, तसेच गडचिरोली पोलीस दल जिल्हाभरातील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहत विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याने,त्याचाच परिपाक म्हणून अतिदुर्गम भागातील नागरिक व जिल्हाभरातील नागरिकांनी पुढे येत नक्षलवाद्यांना जाहीरपणे विरोध केला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वतःहून नक्षलविरोधात पुढे आलेल्या नागरिकांचे कौतुक केले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे म्हंटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens from all over the gadchiroli district protest against naxal week msr
First published on: 26-07-2020 at 13:48 IST