अहिल्यानगर: शहरातील नागरिकांसह एमआयडीसीतील उद्योजक दिवसभरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम शहराच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. भाजपसह नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार मात्र हा वादळी वाऱ्याचा परिणाम आहे. वादळी वाऱ्यांमुळे फलक उडून विजेच्या तारांवर पडतात, झाडाच्या फांद्या तारांवर पडतात. त्यामुळे ‘ब्रेक डाऊन’ घ्यावा लागतो. पावसामुळे दुरुस्तीच्या कामाला वेळ लागतो, तरीही महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीसाठी तत्पर आहेत.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ मे ते काल, दि. २० पर्यंत शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा १० वेळा खंडित झाला. काही मिनिटांसाठी जरी वीजपुरवठा खंडित झाला, तरी पाणी उपशावर परिणाम होऊन त्याचा थेट परिणाम शहरातील पाणी वितरणावर होत असतो. शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यास खंडित वीजपुरवठा जबाबदार असल्याचा ठपका महापालिकेने महावितरणवर ठेवला आहे.

दरम्यान, हा सावेडी उपनगरात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, दुकानदार त्रस्त आहेत. दिवसभरात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित होतो. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी नागरिकांच्या मनात सरकारबद्दल रोष निर्माण होत आहे. महावितरणकडून नागरिकांना योग्य माहिती दिली जात नाही. अधिकारी दूरध्वनी उचलत नाहीत. वीजपुरवठा लवकर सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, सावेडी मंडलाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष प्रियात जानवे, रेणुका करंदीकर, वंदना पंडित, सतीश शिंदे, मनोज ताठे, अरुण शिंदे आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणला दिला आहे. भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनीही स्वतंत्र निवेदन देत महावितरणला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही सुधारणा नाही

गेल्या अनेक महिन्यांपासून एमआयडीसीमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो आहे. काही मिनिटे जरी वीजपुरवठा खंडित झाला, तरी उत्पादनावर मोठा परिणाम होतो. उद्योजकांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यात सुधारणा झालेली नाही.-हरजितसिंग वधवा, उद्योजक

गेल्या वर्षभरापासून त्रास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयडीसीमधील उद्योजकांना खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून जाणवत आहे. उद्योजक नियमित देयके अदा करतात. तरीही वीजपुरवठा सुरळीत मिळत नाही. एमआयडीसीसाठी स्वतंत्र अभियंता नाही. सावेडी उपकेंद्रातून विभागून पुरवठा केला जातो. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.- मिलिंद कुलकर्णी, उद्योजक